मुंबई : बीड हत्याकांड प्रकरणावरुन सुरू असलेल्या आंदोलन व आरोप-प्रत्यारोपांमध्ये आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी परळीतील सांस्कृतिक कार्यक्रमाचा दाखला देत काही अभिनेत्रींची नावे घेतली. मंत्री धनंजय मुंडेंचा संदर्भ देताना आमदार धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेतले, त्यावेळी उपस्थितांनीही हसून दाद दिली. त्यानंतर, प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत महिलांच्या चारित्र्यावर सहजपणे शिंतोंडे उडविण्याचं काम केलं जात असल्याचे म्हटलं. तसेच, बीडमधील हत्याप्रकरणात प्राजक्ता माळीचा काय संबंध, का तिचं नाव इथं जोडलं जातंय असा सवालही तिने केला. तसेच, सुरेश धस यांनी जाहीरपणे माफी मागावी अशी मागणीही तिने केली होता. आता, अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. विशेष म्हणजे आजच ही भेट होईल, अशी शक्यता आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भेटीची वेळ मागितली असून आज संध्याकाळी प्राजक्ता माळी आणि मुख्यमंत्र्यांची भेट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांकडून अद्याप भेटीची वेळ निश्चित करण्यात आली नाही. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ही भेट होऊ शकते. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनीही पत्रकार परिषदेतून याबाबत माहिती दिली होती. आपण, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, आता लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून त्या घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. तसेच, सोशल मीडियावर आणि मीडियाच्या बातम्यांवर आचारसंहिता आणण्यासंदर्भात त्या चर्चा करणार असल्याचंही समजते.
रुपाली चाकणकर यांचं ट्विट
अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे. त्याचा अभ्यास करून, कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल, अशी माहिती ट्विट करुन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली. महिलांबाबत समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान ठेवलं पाहिजे,कारण संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तुत्वावर काम करत आहेत आणि काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारे वक्तव्य व त्याआधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीने ट्रोल करणे याबाबत शासनाकडून कठोर कारवाई करणे बाबत आयोग पुढाकार घेईल, असा इशाराही महिलांबाबत अवमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना देण्यात आला आहे.
हेही वाचा
हा बडा नेता कोण? अंजली दमानियांचा सवाल; स्कॉर्पिओमधील 2 मोबाईल अन् व्हिडिओचा दाखला