Popular Singers Accident: ‘मोगरा फुलला’ कार्यक्रम आटपून परतत असताना प्रसिद्ध गायक गणेश शिंदे (Ganesh Shinde) यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. सुदैवाने गाडीतील एअरबॅग्स वेळेत उघडल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र,या अपघातात गणेश शिंदे यांच्या छातीला दुखापत झाली आहे. तर गायिका सन्मिता शिंदे आणि प्रतिक्षा यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दोघींवरही तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
मोगरा फुलला’ आणि ‘ज्ञानियांचा राजा’ यांसारख्या कार्यक्रमांमुळे गणेश शिंदे आणि त्यांची टीम रसिकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. संत साहित्यावर आधारित गाणी आणि व्याख्यानांमुळे या कलाकारांचा मोठा चाहता वर्ग आहे.
नेमके घडले काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ‘मोगरा फुलला’ हा संगीतमय कार्यक्रम पूर्ण करून गणेश शिंदे, सन्मिता शिंदे आणि गायिका प्रतिक्षा हे तिघे घरी परतत होते. यावेळी त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात होताच गाडीतील एअरबॅग्स क्षणार्धात उघडल्या आणि त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.या अपघातात गणेश शिंदे यांच्यासह गायिका सन्मिता शिंदे आणि गायिका प्रतिक्षा जखमी झाल्या असून दोन्ही गायिकांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.दरम्यान, अपघातानंतर गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.
गणेश शिंदे यांची पोस्ट
"कानावरून गेल.. 'मोगरा फुलला' कार्यक्रम आटपून घरी परतत असताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स ओपन झाल्याने मोठा अनर्थ टळला. मला एअरबॅग्स मुळे छातीला दुखापत झाली असली तरी ती ऑपरेशनशिवाय बरी होण्यासारखी आहे. सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली. मित्रपरिवार, ॲम्ब्युलन्स सेवा आणि माऊली हॉस्पिटल तसेच संचेती हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तातडीने मदत केल्यामुळे सर्व उपचार वेळेत सुरू झाले. प्रतिक्षाचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले असून सन्मिताचेही ऑपरेशन आता व्यवस्थित पार पडेल. ओटीमध्ये जाताना तिला ज्ञानोबरायांचा फोटो दाखवला मोबाईलमध्ये. म्हटले तू आत्ता बरी होशील आणि माऊली समोर अभंग म्हणशील. इवलेसे रोप लावियेले द्वारी...
या संपूर्ण प्रसंगात अनेक प्रश्न मनात येतात, पण शेवटी जाणवत... अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढे अधिक काळजी घ्यायची आणि बाकी सर्व माउलींच्या चरणी स्वाधीन करायचे...आपल्या सर्व रसिकश्रोत्यांचे, मित्रपरिवाराचे, शुभेच्छा व आशीर्वाद आहेतच. अनेक मित्रांनी मान्यवरांनी मनापासून सहकार्य केले व तातडीने मदत उपलब्ध झाली आभारी आहोत. ज्ञानोबारायांची कृपा आणि आपला आशीर्वाद कायम सोबत राहो. तुकोबारायांच्या शब्दांत एवढंच -"कृपाळू सज्जन,तुम्ही संतजन ..परी पायावेगळा करू नका..."
