PM Narenda Modi Slams Opposition On Dhurandhar: 'धुरंधर' आणि 'धुरंधर 2' (Dhurandhar) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (Box Office) अक्षरश: धुमाकूळ घातला. काहींनी हा चित्रपट एंटरटेनमेंट (Entertainment) म्हणून एन्जॉय केला. तर, काहींनी हा चित्रपट प्रोपेगेंडा असल्याचं म्हटलं. दरम्यान, अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केरळमधील (Kerala) तिरुवल्ला येथे एनडीएच्या सभेमध्ये उपस्थित नागरिकांना संबोधित केलं. सभेदरम्यान त्यांनी काँग्रेस, यूडीएफ - एलडीएफवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष खोट्या बातम्या पसरवण्याचं आणि देशाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत.
सभेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विषयांवर उपस्थितांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, 'धुरंधर', 'द केरळ स्टोरी' आणि 'द काश्मीर फाईल्स' या तीन चित्रपटांसंदर्भात विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, 'जेव्हा द केरळ स्टोरी हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा या लोकांनी सांगितलं चित्रपट खोटा आहे. जेव्हा द काश्मीर फाईल्स प्रदर्शित झाला, ते म्हणाले की, हे सर्व खोटं आहे. धुरंधर हा चित्रपट प्रदर्शित झाला, तेव्हा हे लोक म्हणाले, हे सर्व खोटं आहे. परंतु, खोटं बोलण्यात ही लोक तरबेज आहेत', असं पंतप्रधान म्हणाले.
'विरोधकांनी देशातील नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला'
'खोटं पसरवणे हे विरोधकांचं काम आहे. सीएएबद्दल खोटं, यूसीसीबद्दल खोटं आणि अशा चित्रपटांबद्दलही खोटं'. सीएएचं उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'जेव्हा नागरिकत्व सुधारण कायदा आणला गेला. तेव्हा विरोधकांनी देशातील नागरिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, आज सीएए लागू झाला आहे. देशाचे कोणतेही नुकसान झालेले नाही'. तसेच समान नागरी संहितेचा संदर्भ देत ते म्हणाले, 'गोव्यात अनेक दशकांपासून हे लागू आहे. तिथे कोणतीही समस्या नाही', असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
विरोधकांवर खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप
सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'विरोधी पक्ष प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करत आहेत. तसेच खोट्या बातम्या पसरवत आहेत. देशाची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे. प्रेक्षकांना या चित्रपटांची चांगलीच माहिती आणि जाणीव आहे. ते विरोधी पक्षाचा खोटेपणा ओळखत आहेत', असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
