Aryan Khan: किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाकडून आणखीन एक दिलासा मिळाला आहे. कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीनं आर्यन खानसह अन्य काही आरोपींना आरोपपत्रातून क्लीनचीट दिल्याविरोधात हायकोर्टात दाखल झालेली जनहीत याचिका कोर्टाच्या दट्यानंतर मागे घेण्यात आली. याप्रकरणी प्रितम देसाई या विधी शाखेच्या विद्यार्थ्यानं याचिका दाखल केली होती. मात्र या प्रकरणी जनहित याचिका कशी दाखल होऊ शकते?, विद्यार्थ्यांना जनहित याचिका दाखल करायचीच असेल तर अन्यही अनेक विषय आहेत. त्यामुळे ही निव्वळ प्रसिद्धीसाठी केलेली याचिका असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्यानं ती योग्य कशी हे पटवून द्या अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक दंड आकारू असा इशारा देताच याचिकाकर्त्यांनी याचिका बिनशर्त मागे घेतली.


तपासयंत्रणेनं चुकीच्या पद्धतीनं आपल्या अधिकरांचा गैरवापर करत आर्यनसह काही नावं या प्रकरणातून वगळल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला होता. तसेच या प्रकरणात पुन्हा सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी या याचिकाद्वारे करण्यात आली होती. एनसीबीनं आर्यन खानसह 6 जणांची नावं आपल्या आरोपपत्रातून वगळली होती. एनसीबीकडून आरोपपत्रात आर्यन खान, आविन साहू, गोपाळ जी आनंद, समीर सेहगल, भास्कर अरोडा, मानव सिन्हा यांना क्लीन चिट देण्यात आली होती. या प्रकरणात आर्यन खान जवळपास महिनाभर तुरुंगात होता. मुंबई सत्र न्यायालृानं जामीन नाकरल्यानंतर अखेर हायकोर्टानं आर्यन खानला जामीन दिला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई एनसीबीकडून काढून घेतला, आणि एकेदिवशी आर्यन खानला पुराव्यांअभावी दिल्ली एनसीबीनं मे 2022 मध्ये क्लीन चीट जाहीर होती. 


काय होती याचिका ?


या प्रकरणात पोलिसांकडे पुरावे उपलब्ध आहेत की नाही? ते न्यायालयात टिकणार की नाही? ही बाब ठरवण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे. मात्र आरोपींना निर्दोष मुक्त ठरवून न्यायालयाच्या अधिकारावर तपासयंत्रणेनं अतिक्रमण केलं आहे. एखाद्या आरोपीला गुन्ह्यातून वगळण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. मात्र याप्रकरणात पोलिसांकडून अशा प्रकारची कारवाई झालेली नाही. मग कोणत्या दबावातून आर्यनला या प्रकरणातून वगळण्यात आलं हे समोर यायला अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.


काय आहे प्रकरण ? 


एनसीबीनं गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक सेलिब्रिटिंचाही समावेश आहे. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबीचा आरोप होता. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला होता.