Marathi Actress Mrinal Kulkarni On Pankaj Dheer: बी. आर. चोप्रा (B. R. Chopra) यांच्या 'महाभारत' (Mahabharat) या मालिकेत कर्णची भूमिका साकारणारे हरहुन्नरी अभिनेते पंकज धीर (Actor Pankaj Dheer) यांचं निधन झालं आहे. कर्करोगामुळे त्यांनी वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंकज यांनी आधी कर्करोगावर यशस्वीरित्या मात केली होती. पण, काही महिन्यांपूर्वी पुन्हा त्यांना कर्करोगाचं निदान झालं. त्यासाठी त्यांच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली होती. पण, अखेर कर्करोगाशी लढा अपयशी ठरला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. पंकज यांच्या निधनाच्या वृत्तानं कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनीही पंकज धीर यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णीं यांनी पंकज धीर यांचा फोटो शेअर करुन त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. "पंकजजी भावपूर्ण श्रद्धांजली... तुम्ही कायमच तुमच्या व्यक्तिरेखांसाठी आणि प्रेमळ, मनमिळाऊ स्वभावासाठी लक्षात राहाल... ओम शांती", असं म्हणत मृणाल कुलकर्णींनं भावुक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनीही पंकज धीर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.
मुंबईतील विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत संध्याकाळी 4.30 वाजता पंकज धीर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंकज यांच्या निधनावर CINTAA नंही शोक व्यक्त केला आहे. पंकज हे CINTAAचे माजी जनरल सेक्रेटरी होते. पंकज यांच्या पश्चात पत्नी अनीता धीर आणि मुलगा निकितन धीर आणि सून असा परिवार आहे.पंकज धीर यांचा मुलगा आणि सूनही कलाविश्वास सक्रिय आहेत.
पंकज धीर यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेलं. बीआर चोप्रांची लोकप्रिय मालिका 'महाभारत'मधील 'कर्ण'च्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याचबरोबर 'चंद्रकांता' या मालिकेत त्यांच्या 'शिवदत्त' या भूमिकेचीही खूप प्रशंसा झाली. 'बढो बहू', 'युग', 'द ग्रेट मराठा' आणि 'अजूनी' यांसारख्या मालिकेतही त्यांनी काम केलं. याशिवाय, 'सोल्जर', 'तुमको ना भूल पाएंगे', 'रिश्ते', 'अंदाज', 'सड़क' आणि 'बादशाह' यांसारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही त्यांनी उल्लेखनिय भूमिका साकारल्या.