Pandit Shivkumar Sharma Death : पंडित शिवकुमार शर्मा (Pandit Shivkumar Sharma) यांचे कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. पंडित शिवकुमार शर्मा हे एक प्रसिद्ध भारतीय संतूर वादक होते. त्यांचा जन्म 13 जानेवारी 1938, रोजी जम्मूमध्ये झाला होता. त्यांच्या आई गायिका पंडित उमा दत्त शर्मा आणि वडील देखील संगीत क्षेत्रात कार्यरत होते. आई-वडिलांकडूनच त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले होते. त्यांच्या वडिलांनी त्यांना अवघ्या पाचव्या वर्षी तबला वादन आणि गाणे शिकवायला सुरुवात केली होती.


त्यांच्या वडिलांनी संतूर या वाद्यावर विस्तृत संशोधन केले होते आणि शिवकुमार हे जगविख्यात संतूरवादक व्हावेत, असा निर्धार त्यांनी मनाशी केला होता. पंडित शिवकुमार यांनी देखील वयाच्या 13व्या वर्षापासून संतूर वादनास सुरुवात केली आणि आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. 1955मध्ये त्यांनी मुंबईत पहिला कार्यक्रम सादर केला होता.


चित्रपटापासून केली सुरुवात!


पहिला कार्यक्रम सादर केल्यानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांनी 'झनक झनक पायल बाजे' चित्रपटातील एका दृश्यासाठी पार्श्वसंगीत दिले. यानंतर 1960 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम रेकॉर्ड केला. 1967 मध्ये, त्यांनी 'कॉल ऑफ द व्हॅली' नावाचा ‘कन्सेप्ट अल्बम’ अर्थात एका विषयावर आधारित अल्बम तयार करण्यासाठी बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि संगीतकार ब्रिजभूषण काबरा यांच्यासोबत मिळून काम केले. हा अल्बम भारतीय शास्त्रीय संगीतातील सर्वात मोठा हिट अल्बम ठरला.


संतूर वादनावर अनेक अल्बम तयार केले!


पंडित शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत संतूर वादनावर अनेक अल्बम तयार केले. 'द ग्लोरी ऑफ स्ट्रिंग्स - संतूर', 'वर्षा - अ होमेज टू द रेन गॉड्स', 'हंड्रेड स्ट्रिंग्स ऑफ संतूर', 'द पायोनियर ऑफ संतूर’, 'संप्रदाय’, 'वायब्रंट म्युझिक फॉर रेकी', 'एसेन्शियल इव्हनिंग चांट', 'द लास्ट वर्ड इन संतूर' आणि ‘संगीत सरताज’ यासह अनेक प्रायोगिक अल्बम त्यांनी सादर केले. कोणतेही मानधन न स्वीकारता ते विद्यार्थांना संतूर वादन शिकवायचे. भारतच नव्हे तर, जगभरातील अनेक देशांमधून त्यांच्याकडे विद्यार्थी शिकायला यायचे.


‘शिव-हरि’ची जोडी बनून चित्रपटसृष्टी गाजवली!


'कॉल ऑफ द व्हॅली'नंतर बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत त्यांची जोडी चांगलीच जमली. या जोडीने एकत्र मिळून हिंदी चित्रपटांना संगीत देण्यास सुरुवात केली. पंडित शिवकुमार शर्मा आणि बासरीवादक हरिप्रसाद यांच्या या जोडीला चित्रपटसृष्टीत ‘शिव-हरि’ असे नाव देण्यात आले. त्यांनी मिळून 'सिलसिला', 'फाँसले', 'चांदनी', 'लम्हे' आणि 'डर' सारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटांना संगीत दिले. ‘मेरे हातो मैं नौनौ चुडियाँ’ आणि ‘देखा एक ख्बाव’ ही गाणी प्रचंड गाजली होती.


मानाच्या पुरस्कारांवर कोरलं नाव!


शास्त्रीय संगीतावर आधारित अल्बम 'कॉल ऑफ द व्हॅली', रोमँटिक ड्रामा फिल्म 'सिलसिला' आणि 'चांदनी'साठी त्यांना 'प्लॅटिनम डिस्क' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 1985 मध्ये त्यांना अमेरिकेतील बाल्टिमोर शहराचे मानद नागरिकत्व बहाल करण्यात आले. 1986 मध्ये, त्यांना 'संगीत नाटक अकादमी पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. याशिवाय, त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मविभूषण’ या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले होते.


हेही वाचा :


Pandit Shivkumar Sharma Death : पंडित शिवकुमार शर्मांना दिग्गजांची आदरांजली; पंतप्रधान मोदी म्हणाले, 'संगीत विश्वाचं मोठं नुकसान'


Pandit Shivkumar Sharma Passed Away : प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन