Panchayat Season 5: नुकताच ओटीटीवरची हिट वेब सीरिज (OTT Web Series) 'पंचायत'चा (Panchayat) नवा सीझन रिलीज झाला. पण, तरीसुद्धा चर्चा रंगलीय 'पंचायत'च्या त्यापुढच्या सीझनची म्हणजेच, 'पंचायत 5'ची. त्याचं कारणंही तसंच आहे, 'पंचायत 5'ची स्क्रिप्ट लीक झाल्याचं बोललं जात आहे. असं आम्ही नाहीतर 'पंचायत'च्या स्टार कास्टमध्ये (Star Cast of Panchayat) असणाऱ्या मंजू देवी म्हणजेच, नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी सांगितलं आहे. 

ओटीटीवरची सर्वात हिट वेब सीरिज 'पंचायत'मध्ये मंजू देवीची भूमिका साकारणारी दिग्गज अभिनेत्री नीना गुप्तानं नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. आयएएनएसशी बोलताना त्यांनी सांगितलं की, सीरिजच्या पाचव्या सीझनची स्क्रिप्ट आधीच लीक झाली आहे. 

आयएएनएसनं आधीच फॅन्सच्या वतीनं 'पंचायत'च्या टीमला तीन मोठे प्रश्न विचारले. म्हणजे, निवडणूक कोण जिंकणार? सचिवजी आणि रिंकीची लव्हस्टोरी किती पुढे जाणार? आणि सचिवजी आपली परीक्षा पास करणार का? असे काही प्रश्न 'पंचायत'च्या स्टारकास्टला विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांची उत्तरं देताना 'पंचायत'चे लेखक चंदन कुमार यांनी सांगितलं की, "हे तीन प्रश्न आहेतच, पण आणखी एक मोठा प्रश्न आहे की, प्रधानजींना गोळी कोणी मारली? या प्रश्नासह आता सीरिजबाबतचे चार मोठे प्रश्न आहेत. या सर्वच प्रश्नांचं उत्तर तुम्हाला सीझन 5 मध्ये मिळेल. काही प्रश्नांची उत्तरं अगदी थेट मिळतील, पण काही प्रश्नांच्या उत्तरांमध्ये मात्र काही ट्वीस्ट नक्कीच असतील. मला असं वाटतं की, याच गोष्टी 'पंचायत 5'ला मजेशीर बनवतील..."

खरंच 'पंचायत 5'ची स्क्रिप्ट लीक झालीय? 

'मंजू देवी'यांची सीझन जिंकण्याची शक्यता आणि पुढच्या सीझनमध्ये येणाऱ्या ट्वीस्टबाबत बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या की, "स्क्रीप्ट लीक झालीय... तयार व्हा पुढचा सीझन पाहण्यासाठी, कारण 'पंचायत'च्या पुढच्या सीझनची कहाणी आधीच बाहेर आली आहे."

'पंचायत सीझन 4' मध्ये काही प्रश्नांची उत्तरं दिली जातात, पण ही सीरिज काही नवे प्रश्नही मागे सोडते. आता सीझन 5 मध्ये सत्ता बदलल्यानंतर 'पंचायत'मध्ये कोणते बदल दिसून येतील, हे पाहणं रंजक ठरेल? प्रधानजींवर कोणी गोळीबार केला? प्रल्हाद आमदार होणार का? सचिवजी आणि रिंकी लग्न करणार की नाही?

ज्यावेळी 'पंचायत'चे लेखक चंदन कुमार यांना विचारलं गेलं की, सीझन 3 रिलीज करण्यापूर्वीच सीझन 4 ची स्क्रिप्ट तयार करण्यात आलेली? यावर ते म्हणाले की, "हो... मी आधीच पुढच्या सीझनची स्क्रिप्ट लिहायला सुरुवात केलेली. सीझन 3 रिलीज होईपर्यंत सीझन 4 च्या स्क्रिप्टचा फार मोठा भाग आधीच रिलीज करण्यात आलेला. आणि काही महिन्यांनी आम्ही सीझन 4 ची शुटिंग करत होतो. 

दरम्यान, 'पंचायत सीझन 4' 24 जून रोजी प्रदर्शित झाला. या सीझनमध्ये सर्व कलाकार त्यांच्या जुन्या पात्रांमध्ये दिसले. अभिषेक त्रिपाठी सचिवजींच्या भूमिकेत दिसले, तर नीना गुप्ता मंजू देवींच्या भूमिकेत दिसल्या होत्या. ही कथा फुलेरा गावाभोवती फिरते, जिथलं राजकारण आणि गावातल्या लोकांचे स्वभाव यामुळे या सीरिजची कथा आणखी फुलते.