Fawad Khan Abir Gulaal Movie: पहलगाममधल्या ( दहशतवादी हल्ल्यात तब्बल 28 निष्पाप पर्यटकांनी आपला जीव गमावला. त्यानंतर केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. सिंधू कराराला स्थगिती दिली असून भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पाकिस्तानशी निगडीत असलेल्या इतरही अनेक बाबींवर कारवाई करण्याच्या केंद्र सरकार तयारीत असल्याचं बोलंल जात आहे. अशातच आता पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सेलिब्रिटींना केंद्र सरकारनं जोरदार झटका दिला आहे. पाकिस्तानी अभिनेता फव्वाद खान याचा आगामी चित्रपट अबीर गुलाल सिनेमावर भारतात बंदी घातल्याची माहिती मिळत आहे. 

माहिती-प्रसारण मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा अबीर गुलाल रोखल्याची माहिती समोर येत आहे. अबीर गुलाल सिनेमावर भारतात बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. हा सिनेमा येत्या 9 मे रोजी रिलीज केला जाणार होता. या सिनेमात फवाद खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर स्क्रिन शेअर करणार होती. पण, आता सिनेमावरच बंदी घालण्यात आल्यामुळे फवाद खानसोबतच इतरही पाकिस्तानी सेलिब्रिटींसाठी हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. 

फवाद खानची पहलगाम हल्ल्यावर पोस्ट, म्हणाला... 

बॉलिवूड डेब्यू केलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खाननं (Fawad Khan) लिहिलंय की, "पहलगाममधील भयानक हल्ल्याच्या बातमीनं दुःख झालं. या भयानक घटनेतील बळींसोबत आमचे विचार आणि प्रार्थना आहेत. या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाला शक्ती आणि आरोग्यासाठी प्रार्थना करतो." 

मनसे नेते अमेय खोपकरांनी यापूर्वीच घेतलेला आक्षेप 

मनसे नेते अमेय खोपकर यांनी यापूर्वीच अबीर गुलाल सिनेमावर आक्षेप घेत ट्वीट केलं होतं. त्यावेळी खोपकर ट्वीटमध्ये म्हणाले होते की, "पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, हे इतक्या वेळा सांगूनही काही नासके आंबे उपटतातच. मग त्यांना कचऱ्यात टाकायचं काम मनसैनिकांनाच करावं लागणार आणि आम्ही ते करणार, करत राहणार… 'अबीर गुलाल' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही म्हणजे नाही. ज्यांना पाकिस्तानी कलाकारांना डोक्यावर घ्यायचंय त्यांनी खुशाल घ्या, पण लक्षात ठेवा सामना आमच्याशी आहे."

दरम्यान, फवाद खान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. 'अबीर गुलाल' या चित्रपटात तो दिसणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर देखील आहे. हा चित्रपट 9 मे रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र, आता हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच, उनकी बची-कुची जमीन मिट्टी में मिलाने का समय आ गया है, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला मोठा इशारा दिला आहे.