OTT Web Series Amid Twisha Sharma Case: लग्नाच्या पाच महिन्यात अभिनेत्री त्विशा शर्माच्या(Twisha Sharma) संशयास्पद मृत्यूने संपूर्ण देश हादरलाय. तिच्या मृत्यूची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. 12 मे रोजी भोपाळमधील तिच्या सासरी ती संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळलेली. त्यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती.  यानंतर तिचा पती आणि सासूवर हुंडाबळी व छळाचे गंभीर आरोप करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तिचा पती पेशाने वकील आहे. तर तिची सासू माजी जिल्हा न्यायाधीश आहे. त्यामुळे या प्रकरणाला अत्यंत गंभीर स्वरूप प्राप्त झालं. या प्रकरणाकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष असताना ओटीटीवर एका वेब सिरीजची ( OTT Web Series) चर्चा रंगली आहे. ही वेब सिरीज हुंडा प्रकरणावर आधारित असून त्विशाच्या आयुष्याशी मिळतीजुळती असल्याचं म्हटलं जात आहे.

Continues below advertisement

कोणती वेब सिरिज आहे ही ?

या सगळ्यात सोशल मीडियावर एका वेब सिरीजचे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनेकांना त्या मालिकेची कथा त्विशाच्या आयुष्याशी मिळतीजुळती वाटत आहे. ही मालिका म्हणजे ‘मेड इन हेवन’. या मालिकेतील एका एपिसोडमध्ये अशाच प्रकारची घटना दाखवण्यात आली होती. ‘मेड इन हेवन’चा चौथा एपिसोडमध्ये म्हणजेच ‘द प्राइस ऑफ लव्ह’ या नावाच्या भागात श्वेता त्रिपाठी हिने प्रियंका मिश्रा ही भूमिका साकारली आहे. तिच्या पतीच्या भूमिकेत रविश देसाई दिसतो.

या कथेत प्रियंकाचा होणारा नवरा आयएएस अधिकारी असतो. दोघेही साध्या पद्धतीने स्वतःच्या खर्चाने लग्न करण्याचा निर्णय घेतात. मात्र लग्नाच्या दिवशी वरपक्षाकडून अचानक हुंड्याची मागणी केली जाते. होणाऱ्या नवऱ्याचे आई-वडील दोन कोटी रुपये रोख आणि दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये फ्लॅटची मागणी करतात. त्यामुळे लग्न थांबवलं जातं. अखेर, प्रियंकाचे वडील फ्लॅटऐवजी चार कोटी रुपये देण्यास तयार होतात. हा प्रसंग अतिशय भावनिक दाखवण्यात आला आहे. दरम्यान वेडिंग प्लॅनर तारा प्रियंकाला हुंड्याबाबतची सत्य परिस्थिती सांगते.

Continues below advertisement

प्रियंका या सगळ्या प्रकाराकडे पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिचा होणारा पतीही या हुंड्याच्या मागणीला पाठिंबा देतोय. हे कळताच ती लग्न करण्यास नकार देते. त्विशा शर्मा प्रकरण चर्चेत आल्यानंतर हा एपिसोड पुन्हा व्हायरल झाला आहे. अनेक प्रेक्षकांच्या मते, भारतात हुंडा बंदी असतानाही समाजात अजूनही अशा घटना घडत असल्याचे हे कथानक दाखवते.

काय आहे त्विशा शर्मा प्रकरण?

त्विषा शर्मा ही मूळची नोएडाची रहिवासी होती. ती कटारा हिल्स परिसरातील तिच्या घरी मृतावस्थेत आढळली होती. तिच्या पतीचे नाव समर्थ सिंह असून तो व्यवसायाने वकील आहे. या घटनेनंतर पोलिसांनी समर्थ सिंह आणि त्याची आई गिरिबाला सिंह यांच्याविरोधात हुंडाबळीचा छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

12 मे रोजी भोपाळ मधील कटरा हिल्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशाल शर्मा हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तिच्या माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींवर हत्येचा थेट आरोप केला आहे. विषाचा वकीलपती आणि माजी न्यायाधीश सासू या दोघांनी मिळून हत्या करून आत्महत्येची खोटी कथा रचल्याचा दावा त्विशाच्या वडील आणि भावाने केलाय.  त्यामुळे हे प्रकरण सध्या अत्यंत गंभीर वळणावर येऊन थांबले आहे.