Vishal Dadlani On  Indian Idol Removal Roumers: गायक आणि संगीतकार विशाल ददलानी (Vishal Dadlani) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  NEET पेपरफुटी प्रकरणावर सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यानंतर विशालला याला ‘इंडियन आयडल’मधून (Indian Idol) काढून टाकल्याच्या चर्चां रंगल्या होत्या. अखेर पूर्णविराम मिळाला आहे.  शोमधून हटवल्याच्या या सगळ्या चर्चांवर विशाल ददलानीने पहिली प्रतिक्रिया दिलीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या सगळ्या चर्चा स्वतः विशाल ददलानीने फेटाळून लावल्या आहेत.  ‘इंडियन आयडल’च्या सेटवरचा एक व्हिडिओ टाकत त्याने ट्रोलर्सला चपराक लगावलीय.

Continues below advertisement

विशाल ददलानीला इंडियन आयडलमधून काढलं? म्हणाला ..

NEET-UG पेपरफुटी प्रकरणावर प्रतिक्रिया देताना विशाल ददलानीने विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. दरवर्षी अशा घटना घडणं चुकीचं असल्याचं म्हणत त्याने सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले होते. तसेच “देशासाठी चांगले आणि सुशिक्षित प्रतिनिधी निवडा,” असं आवाहनही त्याने केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर विशालला ‘इंडियन आयडल’मधून काढल्याच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. या चर्चांदरम्यान विशालने ‘इंडियन आयडल’च्या सेटवरून एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये तो सुरुवातीला रडण्याचा अभिनय करतो आणि नंतर हसत “Here I am, baby!” असं म्हणताना दिसतो.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये विशालने लिहिलं, “ऑनलाइन दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. खूप मॅनिप्युलेशन सुरू आहे. योग्य गोष्टीसाठी लढत राहा आणि जे बोलणं गरजेचं आहे ते बोला.” विशालच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्याच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं, तर काहींनी बॉलिवूडमधील इतर कलाकारही अशा मुद्द्यांवर बोलत नसल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. दरम्यान, विशाल ददलानीच्या या व्हिडीओमुळे ‘इंडियन आयडल’मधून त्याची हकालपट्टी झाल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Continues below advertisement

काय म्हणाला होता NEET पेपरफुटी प्रकरणात?

“मी हा व्हिडिओ यासाठी बनवत आहे, या नीट पेपरफुटीमुळे ज्या विद्यार्थ्यांना त्रास झाला आहे, त्यांच्याप्रती मला माझा पाठिंबा आणि एकजूट व्यक्त करायची आहे. हे दरवर्षी घडतं, हे चुकीचं आहे; त्याहूनही चुकीचं हे आहे की कोणतीही सरकारी यंत्रणा जबाबदारी घेत नाहीये, आणि त्याहून वाईट म्हणजे मंत्री 'ही काही मोठी गोष्ट नाही' असं म्हणत बसले आहेत. "सत्तेत असलेले लोक सुशिक्षित नाहीत. यामुळे भारताचा नाश होणार आहे. तुम्हाला हे आवडो वा न आवडो, चांगले वाटो वा वाईट, हेच सत्य आहे. कृपया, शक्य असल्यास, चांगल्या लोकांना निवडा. चांगल्या, सुशिक्षित लोकांना मत द्या"