Nutan Birth Anniversary : कधी सुजाता, कधी बंदिनी अशा वेगवेगळ्या भूमिकेत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या नूतन यांची आज 86 वी जयंती. नूतम यांचा जन्म 4 जून 1936 मध्ये मुंबई येथे झाला. बालपणी अनेक लोक नूतन यांना त्यांच्या दिसण्यावरुन टोमणे मारत होते. नूतन यांचे वडील कुमारसेन हे चित्रपट निर्माते होते. तर त्यांच्या आई शोभना या अभिनेत्री होत्या. नूतन यांना वयाच्या आठव्या वर्षी दमयंती चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळाली.
वयाच्या 14 व्या वर्षी नूतन यांना मुगले-ए-आझम चित्रपटातील अनारकली या भूमिकेची ऑफर आली पण त्यांनी ती नाकारली. त्यानंत नूतन यांनी हमारी बेटी चित्रपटामध्ये काम केले. त्याचा अभिनय पाहून त्यांना बालपणी टोमणे मारणारे नातेवाईक देखील त्यांचे कौतुक करू लागले.
नूतन यांनी काही दिवसांनंतर वजन कमी केले. पण या गोष्टीची त्यांच्या आईला काळजी वाटू लागली. त्यामुळे शोभना यांनी नूतन यांना चित्रपटांपासून दूर नेण्यासाठी स्वित्झर्लंडला पाठवले. नूतन यांचे एका वर्षात 22 किलो वजन वाढले. भारतात परतल्यानंतर नूतन यांनी 1952 मध्ये मिस इंडियामध्ये भाग घेतला. त्यानंतर त्यांच्या करिअरची दुसरी इनिंग सुरू झाली. सीमा, पेइंग गेस्ट, अनारी, सुजाता, छलिया, देवी, सरस्वतीचंद आणि मैं तुलसी तेरे आंगन की या चित्रपटांमध्ये काम करून नूतन या आघाडीच्या अभिनेत्री झाल्या.
1959 मध्ये नेव्ही लेफ्टनंट कमांडर रजनीश यांच्याशी नूतन यांनी लग्न केले. लग्नानंतर दोन वर्षांनी नूतन यांना मुलाला जन्म दिला. त्याचं नाव त्यांनी मोहनीश असं ठेवलं. लग्नानंतरही नूतन यांनी चित्रपटांमध्ये काम केलं. नूतन यांना 1990 मध्ये कर्करोग झाल्याचे निदान झाले. त्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचे निधन झाले. नूतन यांनी आठ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने आणि 1975 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा :