TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -


ओठांवर, चेहऱ्यावर जखमा.... KK यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं, कोलकात्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद


प्रसिद्ध गायक केके उर्फ कृष्ण कुमार कुन्नथ यांचे निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. कोलकात्याच्या न्यू मार्केट पोलीस ठाण्यात त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद अशी करण्यात आली आहे. केके यांच्या मृत्यूप्रकरणी आयोजक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. हा कार्यक्रम गुरुदास महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. उत्कर्ष 2022 असं या कार्यक्रमाचं नावं होतं. नजरूल मंचावर हा कार्यक्रम पार पडला होता. गायक केके यांचे कुटुंबीय आज कोलकाता येथे येत आहेत. केके यांचा मृत्यू शारिरीक आजाराने झाला की अन्य कारणाने झाला याचा तपास पोलीस करत आहेत.


KK यांनी मृत्यूपूर्वी कॉन्सर्टमध्ये गायले होते 'हे' गाणे, शेवटच्या परफॉर्मन्सचा Video व्हायरल


केके या नावाने प्रसिद्ध असलेले गायक कृष्णकुमार कुननाथ यांचे मंगळवारी कोलकाता येथे निधन झाले.  केके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला. कार्यक्रमादरम्यान मंचावरच हृदयविकाराचा झटका आला असून नझरूल मंच येथे एका महाविद्यालयाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते, जेव्हा केके सुमारे एक तास गाऊन त्यांच्या हॉटेलवर परतले, तेव्हा त्यांना अस्वस्थ वाटत होते. सुत्रांच्या माहितीनुसार, KK यांना एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. KK यांनी मृत्यूपूर्वी कॉन्सर्टमध्ये जे गाणे गायले, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


'IIFA' पुरस्कार सोहळा अबुधाबीत पार पडणार; सलमान खान करणार होस्ट


'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार'  सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नव्हता. पण यंदा मात्र हा पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा अबूधाबीच्या यास बेटावर होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. रिपोर्टनुसार, यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता कार्तिक आर्यन, शाहिद कपूर आणि सारा अली खानसारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. 


'भूल भुलैय्या-2' ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम; पाहा आत्तापर्यंतचे कलेक्शन 


 अभिनेता कार्तिक आर्यनचा भूल भुलैय्या-2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आत्तापर्यंत 133.09 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट रिलीज होऊन 12 दिवस झाले आहेत. तरी अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. 


दिग्गजांच्या दमदार अभिनयाने बहरलेला 'रानबाजार'; 3 जूनला पुढील भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'रानबाजार' या वेबसिरीजची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वेबसिरीजची कथा तर उत्तम आहे. परंतु या कथेला सत्यात उतरवायचं काम या वेबसिरीजमधील दमदार कलाकारांनी केलं आहे. या वेबसिरीजला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत आहेत. आता पर्यंत या वेबसिरीजचे पाच भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रेक्षकांना पुढील भागाची उत्सुकता आहे. पुढील भाग येत्या 3 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 


अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाचा दिलासा


सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधीत ड्रग प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मुंबईच्या न्यायालयाने दिलासा दिला आहे. तिला परदेशी वारीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. यात तिला अबुधाबी येथील भारतीय दूतावासात दररोज हजेरी लावावी लागेल.तसेच हरेजीची शीट 6 जून रोजी कोर्टात सादर करावी लागणार आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून तिला कोर्टाच्या रजिस्ट्रीमध्ये 1 लाख रुपये जमा करावे लागणार आहे.


‘भिरकीट’चित्रपटामधील ठसकेदार लावणी प्रेक्षकांच्या भेटीला


गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात ‘भिरकीट’  नावाच वादळ घोंगावत आहे. ‘भिरकीट’ च्या ट्रेलरला व गाण्याला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आणखी एक नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्या गाण्याचे बोल ‘डोळ्यावर गॉगल लावा’ असे आहे. हे गाणे लावणी पद्धतीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या गाण्यातून  प्रेक्षकांमध्ये चांगलाच हश्या पिकणार आहे. ‘डोळ्यावर गॉगल लावा’ या गाण्याला उर्मिला धनगर व मंगेश कांगणे यांचा ठसकेदार आवाज मिळाला असून मंगेश कांगणे यांनी हे गाणे शब्दबद्ध केले आहे. 17 जून रोजी ‘भिरकीट’ नावाचे  वादळ संपूर्ण महाराष्ट्रात येणार आहे.


सोनाक्षी सिन्हाला दिलासा; अजामीनपात्र वॉरंटवर आला मोठा निर्णय


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला  अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सोनाक्षी सिन्हावर मुरादाबादमध्ये फसवणुकीचा खटला सुरू आहे. मुरादाबाद येथील न्यायदंडाधिकारी स्मिता गोस्वामी यांच्या समोर प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी खटल्यातील फिर्यादी प्रमोद शर्मा यांनी सोनाक्षी सिन्हा सतत न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे तिच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.  ज्यानंतर सोनाक्षी अलाहाबाद कोर्टामध्ये हजर राहिली. आता तिला आता जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे.


केकेच्या मृत्यूनंतर हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल


मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. हेमांगीने मराठी सिनेमे, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. हेमांगी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची मतं मांडत असते. आता पुन्हा एकदा हेमांगीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हेमांगी कवीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पार्श्वगायक केके यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. 


सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर सलमान खानचं टेन्शन वाढलं? सुरक्षेत वाढ


प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे. सिद्धू मुसेवाला यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता त्यांच्या हत्येनंतर  मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.  सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडच्या प्राथमिक तापासात लॉरेन्स बिश्नोई याचे नाव समोर येत आहे. त्यामुळे आता सलमानची सुरक्षा वाढवण्यात येत आहे.