Nilesh Sable On Raj Thackeray: संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra News) खळखळून हसवणारा लोकप्रिय मराठमोळा कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण, यावेळी या शोमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यापूर्वीच्या सीझनमध्ये संपूर्ण शोची धुरा डॉ. निलेश साबळेच्या (Dr. Nilesh Sabale) खांद्यावर होती. मात्र, यावेळी त्याच्याऐवजी अभिनेता अभिजीत खांडकेकर (Actor Abhijeet Khandkekar) सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे. निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या'मध्ये दिसणार नाही, यावरुन प्रचंड मोठा गदारोळ झाला होता. तसेच, ज्योतिषाचार्य शरद उपाध्ये यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करुन निलेश साबळेवर मोठे आरोप केले होते. त्यानंतर संपूर्ण प्रकरणावर निलेश साबळेनं स्पष्टीकरण दिलं होतं. निलेश साबळे आणि अख्ख्या टीमनं आपल्या दमदार स्कीट्सच्या जोरावर कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवलं. निलेश साबळेनं चला हवा येऊ द्या मंचावर अनेक राजकारण्यांची नक्कल केली होती. एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही नक्कल केली होती. पण, यामुळे निलेश साबळेला चक्क राज ठाकरेंनी (Raj Thackeray) फोन केलेला. याबाबतचा किस्सा स्वतः निलेश साबळेनं सांगितला आहे.
'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात एकदा निलेश साबळेनं राज ठाकरेंची नक्कल केली होती. त्यानंतर निलेश साबळेला राज ठाकरेंनी फोन केलेला. एक-दोन नव्हे, तर तब्बल 17 मिस्ड कॉल्स राज ठाकरेंनी निलेश साबळेला दिले होते. नुकतीच निलेश साबळेनं लोकशाही मराठीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत बोलताना निलेश साबळेनं किस्सा सांगितला आहे.
निलेश साबळेनं सांगितला राज ठाकरेंच्या फोनचा किस्सा, काय म्हणाला?
निलेश साबळे म्हणाला, "अवॉर्ड शोमध्ये मी साहेबांची (राज ठाकरे) नक्कल करायचो. एकदा रात्रभर शूटिंग झालं आणि मी घरी येऊन झोपलो होतो. माझा फोन सायलेंट असतो, त्याच्यावर खूपसारे मिस्डकॉल पडले होते. मी बघायचो फोन व्हायब्रेट होतोय आणि मी तो पुन्हा सायलेंट करुन ठेवायचो. 17 मिस्डकॉल होते. माझ्याकडे त्याचा स्क्रिनशॉट आहे. मला कळेना हा फोन कोणाचा आहे. नंतर एका नंबरवरुन फोन आला आणि त्यावरुन आवाज आला की, 'झोपलाय का? नंतर करु का फोन.' म्हटलं कोण बोलतंय, म्हणाले 'राज ठाकरे बोलतोय'. मला काही क्षण असं वाटलं की, का साहेब मला फोन करतील? काही संबंधच नाहीये. ते मला का फोन करतील? कोणीतरी आमच्यातलाच मित्र, आवाज वगैरे बदलून माझी मजा घेतंय असं मला वाटलं. तर मी म्हणालो, बोला. ते म्हणाले, 'अमेय खोपकरांनी मला तुमचा एक व्हिडीओ दाखवला.' अमेय खोपकर सरांचं नाव घेतल्यानंतर मी थोडा अलर्ट झालो की, कदाचित साहेब आहेत आणि तिथे अमेय सरांचा आवाजही येत होता."
"तिकडून आवाज आला, तुम्ही उशिरा शूटिंग करुन आलात हे कळलंय मला, तुम्ही झोपा, झाली झोप की फोन करा.' म्हटलं नाही नाही साहेब बोला ना. ते म्हणाले, 'मला आवडतो तुमचा कार्यक्रम, मला तुमच्या सगळ्या टीमला भेटायचं आहे. कधी याल.' पुढच्या दोन दिवसांत मी आणि 'चला हवा येऊ द्या'ची संपूर्ण टीम त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांनी खूप आपुलकीनं सगळ्यांचं स्वागत केलं. राजकारण वगैरे सगळं मागे ठेवून फक्त विनोद या एका विषयावर ते दोन अडीच तास आमच्याशी गप्पा मारत होते. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की, ही प्रोसेस कशी आहे. तो विनोद कसा सुचला होता? त्यांनीही आम्हाला काही किस्से सांगितले. तेव्हा एक वेगळे राज ठाकरे आम्हाला अनुभवायला मिळाले.", असं निलेश साबळे म्हणाला.
"इतकी वर्ष एका व्यक्तीबद्दल जी भिती होती, ती अचानक कमी झाली. त्यानंतरही मला दोन-तीन वेळा त्यांना भेटण्याची संधी मला मिळाली. पण छान वाटतं की, ते स्वत:हून म्हणतात की, छान करता तुम्ही. मी एकदा घाबरत घाबरत त्यांना विचारलं होतं की, तुम्ही पाहिलं का? ते मी एक दोन वेळा तुमची नक्कल केली होती. ते म्हणाले, हो हो पाहिलं पाहिलं, चांगलं करता तुम्ही", हा किस्साही निलेश साबळेनं सांगितला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :