Maharani Gayatri Devi Web Series : सध्या मनोरंजन विश्वात ऐतिहासिक घटनांवर आधारलेले चित्रपट मोठ्या संख्येने येत आहेत. यामध्ये राजे, महाराजे, महापुरुष यांच्या जीवानवर आधारलेल्या चित्रपटांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या चित्रपटांना मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळतोय. नुकताच प्रदर्शित झालेला छावा, आगामी काळात सूरज पांचोलीचा केसरी वीर, अभिनेता ऋषभ शेट्टी याचा छत्रपती शिवाजी महाराज या चित्रपटांचा समावेश आहे. दरम्यान, यामध्ये आता ओटोटी दुनियाही मागे राहिलेली नाही. कारण लवकरच एका शाही घराण्याची, राणीची कहाणी वेबसिरीजच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळणार आहे. प्रांजल खंधाडिया हे या वेबसिरीजची निर्मिती करणार असून जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांच्या जीवनावर ही वेब सिरीज आधारलेली असणार आहे.
याबाबत खुद्द प्रांजल यांनीच माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, महाराणी गायत्री देवी यांची कहाणी ही फक्त राजघराण्याची प्रतिष्ठा इथपर्यंतच मर्यादित नाही. त्यांनी हिम्मत दाखवून समाजात बदल घडवून आणण्याचं उदाहरण घालून दिलं, असं प्रांजल यांनी सांगितलं.
चार वर्ष केलं संशोधन
ही वेबसरीज करण्यासाठी प्रांजल आणि त्यांच्या टीमने एकूण चार वर्षे संशोधन केलेलं आहे. या संशोधनासाठी त्यांनी जयपूरच्या राजघराण्याशीही बातचित केली. राजघराण्याशी चर्चा केल्यानंतर ही वेबसिरीज करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर या वेबसरीजच्या कामाला सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार या वेबसिरीजचे एकूण दोन सिझन असतील. प्रत्येक सिझनमध्ये एकूण 8-8 एपिसोड असतील. ही वेबसिरीज महाराणी गायत्री देवी यांच्या जीवनावर आधारलेली असेल.
वेबसिरीजमध्ये नेमकं काय दाखवलं जाणार?
मिळालेल्या माहितीनुसार या वेबसिरीजसाठी कलाकारांची अद्याप निवड झालेली नाही. सध्या वेबसिरीजच्या कथेवर, संवादावर काम चालू आहे. यात महाराणी गायत्री देवी यांचे संपूर्ण जीवन दाखवले जाईल. विशेष म्हणजे या वेबमालिकेत त्यांचं बालपण ते 70 वर्षांपर्यंतचा काळ यात दाखवला जाईल. वेबसिरीजमधील मुख्य पात्रासाठी कलाकाराचा शोध घेतला जात आहे. या वेबसिरीजचे चित्रीकरण राजस्थान, लंडन, अमेरिकेत होणार आहे. ब्रिटेनची राणी एलिजाबेथ ही महाराणी गायत्री देवी यांची मैत्रीण होती. त्यामुळे हेदेखील वेबसिरीजमध्ये दाखवले जाईल. दरम्यान, ही वेबसिरीज प्रत्यक्ष कधी पाहायला भेटणार, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र या वेबसिरीजची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
हेही वाचा :
sayali sanjeev : सायली संजीवचा सफरनामा; शेअर केले दुबई व्हेकेशनचे फोटो!