जिजाऊ आणि शिवराय या माय-लेकराला महाराष्ट्राने आपल्या मनामनात जपलं. देव मानलं. आजवर अनेक अभिनेत्रींनी जिजाऊ नेमकेपणाने साकारली. यात अभिनेत्री रीमा, मृणाल कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर यांचा उल्लेख आवर्जून करायला हवा. तर स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत अमृता पवार या अभिनेत्रीने तरुण वयातल्या जिजाऊ साकारल्या. आता याच मालिकेत नवं वळण येणार आहे. त्यात जिजाऊंची भूमिका नवी अभिनेत्री साकारणार आहे.


सोनी मराठी या वाहिनीवर स्वराज्यजननी जिजामाता प्रसारित होते. या मालिकेत आता अभिनेत्री भार्गवी चिरमुले ही अभिनेत्री जिजाऊ साकारणार आहे. या मालिकेत लीप येणार असून आता मालिकेतले शिवराय 17 वर्षांचे होणार आहेत. त्याचप्रमाणे जिजाऊही मोठ्या होणार आहेत. आता ही भूमिका भार्गवी साकारेल. तर शहाजी राजांच्या भूमिकेतही असणार आहेत स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत शिवराय साकारलेले अभिनेते शंतनु मोघे. या ट्रॅकच्या चित्रिकरणाला आता सुरूवात झाली आहे. मालिकेत येत्या काही दिवसांतच हे नवे कलाकार रसिकांच्या भेटीला येतील.


प्रभास विरुद्ध सैफ सामना रंगणार, आदिपुरुष सिनेमात रावणाची भूमिका ठरली


शिवराय, जिजाऊ, संभाजी महाराज, शहाजीराजे यांना महाराष्ट्राचं दैवत मानलं जातं. त्यामुळेच या अशा व्यक्तिरेखा रूपेरी पडद्यावर साकारताना विशेष काळजी घ्यावी लागते. आजवर जिजाऊ साकारताना अनेक अभिनेत्रींनी आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. भार्गवीही याला अपवाद नसेल. या भूमिकेबद्दल बोलताना भार्गवी म्हणाली, 'जिजाऊंना जगभरात आदर्श मानलं जातं. अशा व्यक्तिमत्वाला पडद्यावर साकारणं हे आव्हान आहे. पण मला खात्री आहे की मी या भूमिकेला पुरेपूर न्याय देईन. ही संधी दिल्याबद्दल सोनी मराठी वाहिनी आणि अमोल कोल्हे यांचे मी आभार मानते. '


Amol Kolhe | खासदार अमोल कोल्हे यांचं मालिका विश्वात कमबॅक