मुंबई: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काही दिवसांपूर्वी कोसळला होता. या घटनेमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. हा पुतळा तयार करण्याचे काम कल्याणमध्ये वास्तव्याला असणाऱ्या जयदीप आपटे (Jaydeep Apte) याला देण्यात आले होते. त्याने अवघ्या सहा ते सात महिन्यांमध्ये हा पुतळा उभारला होता. मात्र, हा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार झाला होता. 

Continues below advertisement

या सगळ्यांतर जयदीप आपटे याला कोणाच्या ओळखीने नौदलाने शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम देण्यात आले, असा सवाल निर्माण झाला होता. जयदीप आपटेला इतके मोठे पुतळे उभारण्याचा अनुभव नव्हता. त्याने स्वत: सनातन दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. मात्र, तरीही त्याच्यासारख्या अनुभव नसलेल्या व्यक्तीला शिवाजी महाराजांचा ब्राँझचा 28 फुटांचा पुतळा उभारण्याचे काम कसे देण्यात आले, अशी शंका उपस्थित करण्यात आली होती. आता याच जयदीप आपटेबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जयदीप आपटे याने एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून कमर्शियल आर्टची पदविका घेतल्याचे सांगितले जाते. मात्र, त्याने शिल्पकलेचे अधिकृत शिक्षण घेतले होते की नाही, याबाबतही आता सवाल उपस्थित केले जात आहेत. शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी याबाबत 'एबीपी माझा'शी बोलताना जयदीप आपटे याच्या शिल्पकलेच्या ज्ञानाबद्दल शंका उपस्थित केली. त्यांनी म्हटले की, जयदीप आपटे आणि माझा परिचय नाही. त्याने रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेतली, असे सांगितले जातेय. पण  रहेजाला शिल्पकलेचा विभागच नाही. मग जयदीप आपटे याने शिल्पकलेची डिग्री कुठून घेतली?, असा सवाल प्रमोद कांबळे यांनी उपस्थित केला. 

Continues below advertisement

रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये अप्लाईड आर्ट आणि पेटिंग आहे. तिकडे जयदीप आपटेने नेमका कुठला कोर्स केलाय, हे तपासले पाहिजे. एखाद्याला पुतळ्याचे काम देताना त्याने शिल्पकलेचे शिक्षण घेतले आहे का, हे तपासायला पाहिजे होते. मला जयदीप आपटेच्या शिल्पकलेच्या शिक्षणाबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. तो जो मी अनेक प्रिंटर वापरुन शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे थ्री डायमेन्शल प्रिंटिंग केले, असे म्हणतोय, तसे शिक्षण अप्लाईट आर्टमध्ये दिले जाते, असे प्रमोद कांबळे यांनी सांगितले.

जयदीप आपटे फरार

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यापासून जयदीप आपटे फरार आहे. मालवण पोलिसांचे पथक त्याच्या कल्यामधील घरी जाऊन आले. मात्र, या घराला टाळे होते. यानंतर पोलिसांनी जयदीप आपटे याच्या पत्नीकडे चौकशी केली होती. त्याची पत्नी माहेरी जाऊन राहिली आहे. परंतु, पोलिसांना अद्याप जयदीप आपटेला शोधून काढता आलेले नाही. जयदीपने स्वत:च मुलाखतीत म्हटले होते की, मी शिवरायांचा पुतळा उभारण्यापूर्वी दोन-तीन फुटी पुतळे तयार केले होते. त्याशिवाय कोणताही अनुभव माझ्याकडे नव्हता. त्यामुळे नौदलाने नेमक्या कोणत्या निकषाच्या आधारे जयदीप आपटेला हे काम दिले, असा सवाल आता निर्माण झाला आहे. 

आणखी वाचा

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणारा ठाण्यातील जयदीप आपटे नेमका कोण?