Neha Kakkar: नेहा कक्करने बॉलीवूडमधून ब्रेक घेतल्याच्या चर्चांना जोर आला आहे. सिंगर नेहा कक्करने प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यातून काही काळ ब्रेक घेण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

Continues below advertisement

नेहाने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने ‘जिम्मेदारी, नाती आणि काम’ यापासून दूर जाण्याचा उल्लेख केला होता. मात्र, ही पोस्ट काही वेळातच डिलीट करण्यात आली. तरीही तिच्या या शब्दांनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.

नेहाने नेमकं काय म्हटलं?

नेहाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती म्हणाली होती,“आता जबाबदाऱ्या, नाती, काम आणि सध्या ज्या-ज्या गोष्टींचा मी विचार करू शकते, त्या सगळ्यांपासून ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. मी परत येईन की नाही, याची खात्री नाही. धन्यवाद.”या पोस्टमध्ये तिने ब्रेकमागचं नेमकं कारण स्पष्ट केलं नव्हतं. त्यामुळे नेहाने खरंच बॉलीवूडमधून संन्यास घेतला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Continues below advertisement

चाहत्यांना आणि पॅपराझींना विनंती

या घोषणेनंतर नेहाने आणखी एक पोस्ट शेअर करत आपल्या प्रायव्हसीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. तिने खास करून पॅपराझी आणि चाहत्यांना तिचं चित्रीकरण किंवा फोटो काढू नयेत, अशी विनंती केली आहे. नेहाने लिहिलं, “मी पॅपराझी आणि फॅन्सना विनंती करते की कृपया माझं चित्रीकरण करू नका. माझ्या प्रायव्हसीचा आदर करा आणि मला शांततेत जगू द्या. प्लीज, कोणताही कॅमेरा नको.”

मॅनेजमेंटची अद्याप प्रतिक्रिया नाही

नेहा कक्करच्या ब्रेकबाबत तिच्या मॅनेजमेंटतर्फे अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. उल्लेखनीय म्हणजे, नेहा आणि तिचा भाऊ टोनी कक्कर यांच्या ‘कॅंडी शॉप’ (लॉलीपॉप हुक म्हणून ओळखलं जाणारं) या गाण्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं जावं लागलं होतं. हे गाणं 15 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालं होतं.नेहाचा हा निर्णय तात्पुरता ब्रेक आहे की खरंच करिअरपासून कायमचा विराम, याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.