Girija Oak Interview CM Devendra Fadanvis: राज्यभरात महापालिका निवडणुकांचा धुरळा उडतोय. पक्षफुटी, नाराजीनाट्य रंगू लागली आहेत. सत्तेचं पारडं कुठे झुकणार याकडे प्रत्येक नागरिकाचं लक्ष लागलंय. मनपा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय पक्षांच्या सभांचा दणका उडालाय. प्रचार रंगात आलाय. निमित्ताने अनेक नेते मुलाखती देताना दिसतायत. राज्यातील महापालिका रणधुमाळीत मुंबई, ठाणे, पुण्यातील लढतींकडे विशेष लक्ष असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांच्या एका नव्या इमेज बिल्डिंगच्या राजकीय पॅटर्नकडे सगळ्यांचं लक्ष जातंय. पालिका निवडणुकीच्या धुरळ्यात मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधाननंतर आता नुकतीच नॅशनल क्रश ठरलेली अभिनेत्री गिरीजा ओक देवा भाऊंची मुलाखत घेणार आहे.
ठाण्यात तेजश्री, पुण्यात गिरीजा!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढलेला असताना बड्या राजकीय नेत्यांच्या मुलाखतींनी निवडणुकांना नवा रंग चढला आहे. यात अनेक नेत्यांच्या मुलाखती चर्चेत असताना काही दिवसांपूर्वीच ठाणे महापालिकेच्या पाश्वभूमीवर 'वीण दोघातली तुटेना' या लोकप्रीय मालिकेतील अभिनेत्री तेजश्री प्रधानने 'आपलं ठाणे आपले देवाभाऊ' कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत तिने मुंबईकर म्हणून काही प्रश्न आणि समस्या देखील मांडल्याचं पाहायला मिळालं.
आता देशभरातील तरुणाईची क्रश म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा ओक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पुणे शहराच्या 'संवाद पुणेकरांशी' नावाचा विशेष संवादात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ही मुलाखत होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (11 जानेवारी ) सायंकाळी 7 वाजता एरंडवणे येथील शुभारंभ लॉन्स येथे थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक आणि प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
भारतीय जनता पक्षाचा सेलिब्रिटी पॅटर्न
कुठल्याही प्रचारात लोकप्रिय चेहरा त्यातूनही एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीचा चेहरा असला की लोकांचं लक्ष आपोआप आपल्याकडे वळतं हे राजकारणातलं तसं जुनंच समिकरण. हे भारतीय जनता पक्षाने बरोबर हेरले असल्याची चर्चा होतेय. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय जनता पक्षाला अनेक मराठी कलाकारांनी जाहीर समर्थन दिल्याचंही दिसलं होतं. यात अभिनेते व निर्माते महेश कोठारे यांच्यासह अभिनेत्री निवेदिता सराफ यांचं भाजप प्रेम नागरिकांनी नुकतंच पाहिलंय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हाच सेलिब्रिटी पॅटर्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतींमध्येही दिसतोय. ठाण्यात अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि पुण्यात नॅशनल क्रश गिरीजा ओक हे चेहरे मुलाखतकार म्हणून दिसणार असल्याने चर्चा रंगली आहे.