मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्षण अखेर साकारला आहे. गेल्या दोन दशकांपासून ज्याची जनता प्रतीक्षा करत होती, ती शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची घडी बसली आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सुप्रसिद्ध मराठी अभिनेता आणि शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) सक्रिय झाल्याचे दिसत आहे. आदेश बांदेकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आघाडीच्या उमेदवारांसाठी प्रचार करताना दिसत असून, यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केला आहे.(Aadesh Bandekar)
आदेश बांदेकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत, आदेश बांदेकर स्वतः केदार शिंदे यांच्या घरी प्रचारासाठी गेलेले दिसत आहेत. आदेश यांनी 'युती' म्हणत केदार शिंदे यांच्यासोबत फोटो देखील क्लिक केला. हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर करत आदेश बांदेकर यांनी, 'वार्ड १२२ (हिरानंदानी गार्डन पवई ) येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) अधिकृत उमेदवार निलेश साळुंखे यांच्यासोबत घरोघरी प्रचार करताना (निशाणी मशाल)...लेखक दिग्दर्शक केदार शिंदे यांची भेट झाली' असं कॅप्शन लिहिलं आहे.(Aadesh Bandekar)
महापालिका निवडणुका जवळ आल्याने प्रचाराचा जोर वाढताना दिसत आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, त्यानंतर १६ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. दरम्यान, आदेश बांदेकर यांच्या कारकिर्दीकडे पाहिले तर ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांना विशेष ओळख मिळाली. याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपटांतही भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत सांगायचे झाल्यास, २००९ मध्ये त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून त्याच वर्षी विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरीही त्यांनी पक्षसंघटनेत सक्रिय राहून काम सुरू ठेवले. पुढे २०१२ मध्ये आदेश बांदेकर यांची शिवसेना ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.