Nana Patekar : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचे आज निधन झाले. पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. वयाच्या 77 वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजकीय नेत्यांपासून ते चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांपर्यंत विक्रम गोखलेंच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत नाना पाटेकर यांनी लिहीले आहे की, विक्रम मी कायम तुझ्यासमोर नतमस्तक होतो...असेन.. तुझ्यासारखा कलावंत आणि माणूस होणे नाही. अशा शब्दांत त्यांनी विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे.
विक्रम गोखले आणि नाना पाटेकर अगदी जवळचे मित्र होते. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्सेही आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत एकत्र काम केले आहे. विशेष म्हणजे, 'नटसम्राट' या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना जास्त भावली. प्रेक्षक अगदी या भूमिकेच्या प्रेमात पडले होते. नाना पाटेकर यांनी साकारलेल्या आप्पा बेलवलकर यांच्या जिगरी दोस्ताची भूमिका विक्रम गोखले यांनी साकारली होती.
2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या नटसम्राट या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. या चित्रपटात नाना पाटेकर यांनी गणपतराव बेलवकर ही भूमिका साकारली होती. तर अभिनेते विक्रम गोखले यांनी रामभाऊंची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील त्यांचे डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
घरातूनच मिळाला अभिनयाचा वारसा
विक्रम गोखले यांना बालपणीच अभिनयाची गोडी लागली होती. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले म्हणजेच कमलाबाई कामत यादेखील अभिनेत्री होत्या. तसेच त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनीदेखील अनेक सिनेमांत काम केलं आहे.
विक्रम गोखले यांनी वयाच्या 26 व्या वर्षी 1971 साली अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात त्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. या सिनेमाचे नाव 'परवाना' असे होते. 'हम दिल दे चुके सनम' या ब्लॉकबस्टर सिनेमात विक्रम गोखलेंनी काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेच्या माध्यमातून कमबॅक केलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या :