Nana Patekar Dreams In Marathi Statement: सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, गायक, निर्माते, डान्सर असलेले बहुगुणी अभिनेते सचिन पिळगांवकरांनी (Sachin Pilgaonkar) आजवर मराठी (Marathi Movie) आणि हिंदी सिनेसृष्टीत (Hindi Film) मोठं काम केलं. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलेल्या सचिन पिळगांवकरांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक भूमिका पडद्यावर अजरामर केल्या. आपल्या मुलाखतींमधून ते नेहमीच आपल्या कारकीर्दीतले अनेक किस्से शेअर करत असतात. आपल्या अनेक वक्तव्यांमुळे सचिन पिळगांवकर चर्चेतही असतात. असंच एक वक्तव्य सचिन पिळगांवकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केलेलं. आपल्याला दिग्गज अभिनेत्री मीनाकुमारी यांनी उर्दू भाषा शिकवल्याचं सांगितलेलं. तसे पिळगांवकर अनेकदा बोलताना शेरो शायरी करतात, उर्दू (Urdu Language) गझल्सचे दाखलेही देतात. उर्दू भाषेची गोडी त्यांना मीनाकुमारी (Meena Kumari) यांच्यामुळे लागल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं.
एका कार्यक्रमात उर्दू भाषेबद्दल बोलताना ते म्हणाले की, त्यांची मातृभाषा जरी मराठी असली तरीही ते विचार उर्दू भाषेतूनच करतात. त्यावेळी त्यांचं हे वक्तव्य प्रचंड व्हायरल झालेलं. पण, आता त्याचप्रकारचं एक वक्तव्य दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांनी केलं आहे. नाना पाटेकरांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात. कारण ज्याप्रमाणे सचिन पिळगांवकरांनी उर्दू भाषेचा आधार घेत वक्तव्य केलेलं, त्याचप्रमाणे नाना पाटेकरांनी मराठी भाषेचा दाखला देत वक्तव्य केलंय. आता काहीजण नानांनी केलेलं वक्तव्य हा सचिन पिळगांवकरांना जोरदार टोला असल्याचं म्हणत आहेत.
नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले? (Nana Patekar On Marathi Language)
नाना पाटेकर एका कार्यक्रमासाठी एमजीएम विद्यापीठात उपस्थित राहिलेले. त्यावेळी त्यांनी हिंदी भाषेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आपण सर्वांना (इतर राज्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांना) समजावं म्हणून हिंदीत संवाद साधल्याचं नानांनी स्पष्ट केलं. नाना पाटेकर म्हणाले की, "मराठी मध्ये बोलताना शब्द शोधावे लागत नाहीत. ते सहज येतात, पटकन तोंडी येतात... कारण, मला स्वप्न ही मराठीमध्ये पडतात. ती माझी मातृभाषा आहे...", असं नाना म्हणाले. नाना पाटेकर यांनी केलेलं हे वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. नाना पाटेकरांनी बोलताना कुठेही सचिन पिळगांवकरांचा उल्लेख केलेला नाही, तरीसुद्धा अनेकांनी त्यांचं हे वक्तव्य सचिन पिळगांवकरांच्या उर्दू भाषेतील वक्तव्याशी जोडलं आहे.
सचिन पिळगांवकर उर्दू भाषेबाबत काय म्हणालेले? (Sachin Pilgaonkar On Urdu Language)
काही महिन्यांपूर्वी सचिन पिळगांवकर एका जाहीर कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले. या कार्यक्रमात त्यांनी उर्दू भाषेवर असलेलं प्रेम व्यक्त करताना म्हटलेलं की, "माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार उर्दू भाषेतून करतो... मला जर माझी बायको किंवा इतर कोणीही रात्री 3 वाजता जरी उठवलं तरीही मी उर्दू भाषेतूनच बोलून जागा होतो. मी केवळ उर्दू भाषेतून जागा होत नाही, तर मी उर्दूसोबतच झोपतो... माझी उर्दू भाषा ही माझ्या बायकोला सवत म्हणून आवडते... माझं त्या भाषेवर असलेलं प्रेम माझ्या बायकोला आवडतं..."
दरम्यान, सचिन पिळगांवकरांचं उर्दू भाषेबाबतचं वक्तव्य जोरदार व्हायरल झालेलं. त्यावेळी अनेकांनी त्यांना ट्रोल केलेलं, तर अनेकांनी त्यांची बाजू घेत उर्दू भाषेचा गोडवा समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला. पण, आता नानांनी तसंच वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. नाना पाटेकरांनी कुणाचंही नाव न घेता, मराठी भाषेबाबत अभिमान व्यक्त करताना केलेलं वक्तव्य आता नेटकऱ्यांकडून थेट सचिन पिळगांवकरांच्या उर्दू भाषेच्या वक्तव्याशी जोडलं जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :