Nana Patekar, Mumbai : 'मी टू' प्रकरणी जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना अखेर दिलासा मिळालाय. लैंगिक छळाचा आरोप झाल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात नाना पाटेकर यांच्याविरोधातील तक्रार दंडाधिकारी न्यायालयानं फेटाळून लावली. अभिनेत्री तनुश्री दत्ता हिनं दाखल केलेल्या तक्रारीत लैंगिक शोषणाचे आरोप सिद्ध करणारे पुरावे उपलब्ध नसल्याचं स्पष्ट करत दंडाधिकारी कोर्टानं तनुश्रीची याचिका फेटाळून लावली आहे.
पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने तनुश्रीने दाखल केलेली तक्रार रद्द
तनुश्री दत्तानं नाना पाटेकर आणि इतरांविरोधात अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात विनयभंग तसेच धमकीची तक्रार दाखल केली. यावर दंडाधिकारी निलेश बन्सल यांच्यासमोर सुनावणी झाली. नाना पाटेकर यांच्यावतीनं ऍड. अनिकेत निकम यांनी बाजू मांडली. मुंबई पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट तसेच पुरेशा पुराव्यांअभावी न्यायालयाने तनुश्रीने दाखल केलेली तक्रार अखेर रद्द केली.
2008 साली चौघांविरोधात दाखल करण्यात आली होती एफआयआर
अभिनेत्री तनुश्री दत्तानं साल 2008 मध्ये नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक अब्दुल सामी सिद्दीकी आणि निर्माता राकेश सारंग यांच्याविरोधात एका डान्स सिक्वेन्स दरम्यान लैंगिक छळाचा आरोप केला होता. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात या चौघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
तनुश्री दत्ताने ऑक्टोबर 2018 मध्ये ही तक्रार दाखल केली होती. यामध्ये म्हटलं होतं की, 2008 मध्ये 'हॉर्न ओके प्लीज'च्या एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान पाटेकर यांनी माझा छळ केला होता. पाटेकर यांनी अश्लील किंवा अस्वस्थ करणारे स्टेप करणार नाहीत, असे स्पष्टपणे सांगितले होते तरीही त्यांनी तिला अनुचित प्रकारे स्पर्श केला. पाटेकरांसोबत तनुश्री दत्ताने तक्रारीत आचार्य, सिद्दीकी आणि सारंग यांचेही नाव घेतले होते. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी अहवाल दाखल केला होता, ज्यामध्ये कोणताही गुन्हा सिद्ध झाला नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर तनुश्री दत्ता यांनी डिसेंबर 2019 मध्ये निषेध याचिका दाखल केली, ज्यामध्ये आरोपींविरुद्ध पुढील तपास आणि कारवाईची विनंती केली गेली. मात्र, आता न्यायालयाने नाना पाटेकरांना मोठा दिलासा दिलाय.
इतर महत्तवाच्या बातम्या