Nana Patekar On Politics: मला सगळ्याच राजकीय पक्षांकडून ऑफर मिळाली असल्याचे मोठं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी केले. मला ऑफर असली तरी मी ही ऑफर स्वीकारणार नसून राजकारण हा आपला प्रांत नसल्याचे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केले.मागील दिवसांपासून नाना पाटेकर निवडणूक लढवणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देताना नाना पाटेकर यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर नाना पाटेकर राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली.
आज मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर नाना पाटेक आणि मकरंद अनासपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी आपली राजकारणातील प्रवेशाबाबत भूमिका स्पष्ट केली. नाना पाटेकर यांनी म्हटले की, मला सर्वच पक्षातून ॲाफर आहे. पण मला ते जमणार नाही, लोकांनी ठरवले पाहिजे. मी मूळात राजकारणात जावू इच्छित नसल्याचेही त्यांनी म्हटले. पत्रकारांच्या एका प्रश्नावर उत्तर देताना नाना पाटेकर यांनी मला कळवा कुठून निवडणूक लढवायची असा उलट प्रश्न केला.कितीही प्रश्न विचारले तरे तुम्ही मला पकडू शकत नाही असेही नाना पाटेकर यांनी म्हटले. नाम फाऊंडेशनची सुरुवातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी झाल्या आहेत. हमी भाव योग्य मिळाला तरच आत्महत्या रोखतां येतील. या सरकारकडून अपेक्षा असल्याचे सांगतया गोष्टी चुटकी सरशी सुटतील असं नाही हेदेखील नाना पाटेकर यांनी नमूद केले.
आता सरकारकडे मागू नका, तर...
आता सरकारकडे मागू नका, सरकार कोणते करायचे हे ठरवा, असे आवाहन नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक येथे झालेल्या शेतकरी साहित्य संमेलनात केले होते. कुठले आदर्श ठेवता आमच्या पिढीसमोर तुम्ही, काय चालले आहे? असं म्हणत सध्याच्या राजकीय घडामोडींवरही पाटेकरांनी भाषणातून नाराजी व्यक्त केली.
नटसम्राट आज करावे लागले तर वेगळ्या पध्दतीने करेल. नटसम्राटाचे दुःख जे आहे ते चार भिंतीमधील आहे. गोंजारलेले दुःख आहे, आम्ही मात्र सर्व आयुष्यच आभाळाखाली ठेवलेले आहे. आमच्या पिकाला तिजोरी नसते, त्याचा एक रास्त भाव आहे तो द्या, यापलीकडे काय मागणे मागितले. काय ते मागू नका, आता सरकार कोणते करायचे ते ठरवा. मला राजकारणात जाता येत नाही, कारण जे पोटात ते ओठात येते, मला पक्षातून काढतील, असेही नाना पाटेकर यांनी यावेळी म्हटले होते.