मुंबई : दिग्गज अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या घरावर गोळीबार प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणाशी निगडित अनमोल बिश्नोई याच्या प्रत्यापर्पणाची प्रक्रिया पोलिसांनी चालू केली आहे. अनमोल बिश्नोई हा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ आहे. सध्या अनमोल बिश्नोई हा अमेरिकेत आहे. त्यालाच भारतात आणण्यासाठी ही प्रत्यार्पणाची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे.
पोलिसांनी काय माहिती दिली?
मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एबीपी न्यूजला याबाबत माहिती दिलेली आहे. या माहितीनुसार मकोका कोर्टाने याआधीच अनमोल बिश्नोईविरोधात अजामिनपात्र वॉरंट जारी केलेलं आहे. यासह विदेशात त्याचा शोध घेण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आलेली आहे. असे असताना आता त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. अनमोल बिश्नोईच्या प्रत्यार्पणासही मोका कार्टोने 16 ऑक्टोबर रोजीच परवानगी दिलेली आहे. या परवानगीचे कागदपत्र हातात आल्यावर या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
पहाटे पाच वाजता झाला होता गोळीबार
अनमोल बिश्नोईवर सलमान खानच्या गॅलेक्सी नावाच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येत आहे. याच प्रकरणात त्याला अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एप्रिल महिन्यात सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. रविवारी पहाटे पाच वाजता ही घटना घडली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर सलमान खानच्या घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तेव्हापासून पोलिसांकडून याबाबत तपास केला जात आहे.
सलमान खानला जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई हे नावही बरेच चर्चेत आहे. सलमान खान याने हरिणाची शिकार केलेल्या कथित प्रकरणी माफी मागावी अशी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची मागणी आहे. याच मागणीला घेऊन सलमान खानला जीवे मारण्याची धमकी बिश्नोईच्या गँगने अनेकवेळा दिलेली आहे. तेव्हापासून सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे.
हेही वाचा :
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; आरोपीच्या पायाला लागली गोळी, पोलिसांचा तपास सुरू