ठाणे: राज्यभरात दिवाळीचा उत्साह असताना ठाण्यातील कासारवडवली परिसरात एक दु्र्दैवी घटना घडली आहे. येथील हिरानंदानी इस्टेटमधील (Hiranandani Estate) पेनिकल या इमारतीच्या 22 व्या मजल्यावरुन उडी टाकून एका महिलेने (वय 45) आत्महत्या (Thane Suicide) केली. संबंधित महिला ही या इमारतीमध्ये काम करण्यासाठी आली होती. प्राथमिक माहितीनुसार, या महिलेचा पती आणि मुलगा दुर्धर आजाराने ग्रस्त होते. या सगळ्याला कंटाळून महिलेने पेनिकल इमारतीच्या 22 व्या मजल्यावर असणाऱ्या रेफ्युज फ्लॅटमध्ये जाऊन तिकडून खाली उडी टाकल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघबीळ परिसरात रहाणारी ही महिला हिरानंदानी इस्टेटमधील पेनिकल इमारतीमध्ये एका रुग्णाला मसाज करण्यासाठी आली होती. त्यामुळे तिच्याकडे पेनिकल इमारतीत प्रवेश करण्यासाठीचे अॅक्सेस कार्ड होते. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ती पेनिकल इमारतीमध्ये रुग्णाला मसाज करण्यासाठी आली होती. यानंतर ती एक्सेस कार्डचा वापर करुन 22 व्या मजल्यापर्यंत पोहोचली. याठिकाणी तिने पायऱ्यांवर बसून गुटखा खाल्ला. यानंतर ती या मजल्यावरील रेफ्युज फ्लॅटमध्ये गेली आणि तिकडून खाली उडी टाकली.
या महिलेचा पती किडनीच्या विकाराने त्रस्त होता. तर तिच्या मुलालाही डोळ्यांचा विकार होता. या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. या सगळ्यामुळे ही महिला प्रचंड नैराश्यात होती. याच नैराश्याच्या भरात महिलेने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर हिरानंदानी इस्टेटमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलेचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात सोपवण्यात आला. आता पोलीस या घटनेमागे अन्य कोणते कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
नेरुळमध्ये वकिलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ
नवी मुंबईच्या नेरुळ परिसरातील एका वकिलाचा संशायस्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अमरेश वाक्कर (वय 49) हे नेरुळच्या सेक्टर 21 मध्ये एकटेच राहत होते. ते गेल्या काही दिवसांपासून फोन उचलत नव्हते. त्यामुळे त्यांचे मित्र त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अमरेश यांचा मृतदेह आढळला. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याकडे पोलिसांच्या नजरा लागल्या आहेत.
आणखी वाचा
धक्कादायक! मी जीवन एन्जॉय केले म्हणत पोलिस उपायुक्तांच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या
भाजपच्या माजी खासदाराच्या पुतण्याची आत्महत्या, मुंबईतील इमारतीवरून उडी घेऊन जीवन संपवलं