मुंबई : दादरचा शिवाजी पार्क हा भाग नेहमी गर्दीने फुललेला असतो. अगदी सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होणारी लोकांची वर्दळ रात्री दीड दोनपर्यंत असते. आता लॉकडाऊन काळामध्ये या फिरण्याला अंकुश बसला आहे. तरीही अलिकडे जेव्हा मुंबई तिसऱ्या स्तरावर आली आहे, तेव्हा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी गर्दी असते. अनेक लोक फिरायला येतात. काही व्यायामाला येतात तर काही गप्पा मारायला येतात. पण अगदी अशावेळी गर्दी असतानाच मंगळसूत्र चोरीला गेलं तर? एका सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीबाबत असा प्रकार घडला आहे. 


सहज फिरायला बाहेर पडलेल्या अभिनेत्री सविता मालपेकर यांना हा अनुभव आला आहे. सविता मालपेकर गेली तीसपेक्षा अधिक वर्षं मनोरंजनसृष्टीत काम करतायत. त्यांना हा अनुभव आला आहे. एबीपी माझाशी बोलताना सविता म्हणाल्या, मी माहीमला राहते. नेहमीप्रमाणे शिवाजी पार्कला मी गेले. फोनवर बोलत बोलत मी गेट नंबर 5 पाशी बसले होते. तिथे एक माणूस आला आणि त्याने मला किती वाजले म्हणून विचारलं. मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे घड्याळ नाहीय. तर तो म्हणाला, आपके पास मोबाईल है ना.. उसमे देखकर बताईये. असं म्हटल्यावर मी त्याला मी तसं नाही करणार असं सांगितलं. त्यानंतर तो पुढे चालत गेला. आता कुणीही माणूस असं विचारून पुढे गेल्यावर आपण त्याच्यावर नजर ठेवत नाही. तसं मीही फोनवर बोलत बसले. त्यानंतर तो पुढच्या फुटपाथवर जाऊन माझ्या मागे कधी आला ते मला कळलं नाही. मी फोनवर बोलत असताना, अचानक मागून पाठीजवळ काहीतरी हालचाल झाल्यासारखं वाटल आणि काही कळायच्या आत त्याने माझ्या गळ्यातली चेन खेचली. ती इतकी जोरात होती की माझे कपडेही फाटले. 


ही घटना घडली तेव्हा भवताली गर्दी होतीच. या चेनचोरीच्या प्रकाराबद्दल बोलताना सविता पुढे म्हणाल्या, मी लगेच आरडाओरडा केला. आजुबाजूला गर्दी होती, पण हे लोक जमायच्या आत त्याने समोर लावलेल्या बाईकवरून पोबारा केलासु्द्धा. त्यानंतर तातडीने सविता यांनी दादर पोलिसांशी संपर्क साधला. याबद्दब त्या म्हणाल्या, मुंबई पोलिसांचे मी आभार मानते. कारण त्यांनी लगेच हालचाल करून तो कुठे दिसतो का हे पाहिलं. एक-दोन सीसीटीव्हीमध्ये तो दिसला आहे. त्याचा चेहरा पोलिसांना दिसला आहे. आता पोलिस पुढची कारवाई करतील. पण खरंतर शिवाजी पार्क हा भाग गर्दीचा असतो. या संपूर्ण भागातच सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे. त्यामुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसेल. इथे कोण कधी आणि कितीवेळ बसतं.. काय करतं यावरही लक्ष ठेवता येईल. 


सविता यांची चेन अद्याप मिळालेली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार पोलिस याचा शोध घेत आहेत, येत्या काही दिवसात याबद्दल पुढची माहिती हाती येईल असा विश्वास त्यांना वाटतो.