Mukund Phansalkar Passed Aaway : 'नक्षत्रांचे देणे' फेम प्रसिद्ध गायक मुकुंद फणसळकर (Mukund Phansalkar) यांच्या निधनाची दु:खद बातमी समोर येत आहे. मुकुंद फणसळकर यांनी पुण्यातील रुग्णालयातील अखेरचा श्वास घेतला. मुकुंद यांच्या निधनानंतर संगीतकार सलील कुलकर्णी यांनी मुकुंद यांच्यासाठी भावनिक पोस्ट केली आहे.
माहितीनुसार,मुकुंद यांच्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरु होते. पण अखेर 19 नोव्हेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झी मराठी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या कार्यक्रमातून मुकुंद फणसळकर हे घराघरांत पोहचले. त्यांच्या जाण्याने मराठी संगीत विश्वालाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या जाण्याने शोक व्यक्त केला जातोय.
सलील कुलकर्णी यांनी शेअर केली पोस्ट
मुकुंद यांच्या जाण्याने सलील कुलकर्णी यांनी पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की, मुकुंद फणसळकर गेला...अतिशय आवडता गायक..एकेक शब्द असा गायचा की कवीला सुद्धा नव्याने अर्थ उलगडावा...आम्ही शाळा कॉलेज मध्ये असताना ज्यांनी गायनाने..बोलण्याने भारावून टाकलं होतं...त्यातलं एक महत्त्वाचं नाव ….खूप खूप वाईट वाटलं..प्रीतरंग , साजणवेळा , नॅास्टॅस्जिया …. सगळ्या मैफिली डोळ्यासमोर आल्या..एका गुणी आणि संवेदनशील माणसाला भावपूर्ण श्रद्धांजली..
त्यागराज खाडिलकरांनीही शेअर केली भावनिक पोस्ट
त्यागराज खाडिलकर यांच्यासह मुकुंद यांच्या कारकिर्दिला सुरुवात झाली. त्यांनी म्हटलं की, आणि आज तो गेला.. मुकुंद फणसळकर आणि माझी संगीत सेवा एकत्रच सुरू झाली.. आम्ही स्थापन केलेली स्वरांकित नावाची संस्था, जागतिक मराठी परिषदेची स्मरण यात्रा, हिंदी सारेगमप, अनेक अनेक रंगमंचीय कार्यक्रम.. रसिकांनी आम्हा दोघांनाही उमेदीचे तरुण गायक म्हणून मनापासून स्वीकारलं होतं!.. त्याचा नितळ, निर्दोष, तलम आवाज, सुरेल गळा आणि एकूणच संगीत, सिनेमा आणि साहित्य यातलं अफाट ज्ञान व माहिती.. यामुळे तू रसिकांच्या आणि व्यक्तिशः माझ्या..सदैव स्मरणात राहशील मित्रा.. आमच्या स्मरण यात्रेत..!!