मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं सर्वांना वर्क फ्रॉम होम या नव्या पद्धती अंतर्गतच काम करावं लागत आहे. काही महिने आणि त्यामागोमाग एक वर्ष उलटूनही परिस्थिती मात्र सुधरण्याचं नाव घेत नाही आहे. त्यामुळं घरातल्या घरातच राहून काम करणाऱ्या अनेकांनाच आता आता मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. पण, या साऱ्या वातावरणात काही सकारात्मक गोष्टीही आहेतच. अभिनेत्री दिया मिर्झा हिची सोशल मीडिया पोस्ट हेच सांगत आहे. 

कोरोनाकाळात वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांमध्ये दियाचाही समावेश आहे. खुद्द दियानंच पोस्ट केलेला एक फोटो पाहून याचा अंदाज लावता येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना आपण सारे करत असतानाच सोशल मीडियावरील काही पोस्ट या अतिशय सकारात्मक उर्जा देणाऱ्या ठरत आहेत. अभिनेत्री दिया मिर्झा हिनं काही दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याचं जाहीर केलं. या गरोदरपणाच्या काळातच ती आपल्या जबाबदाऱ्याही विसरलेली नाही. घरातूनच काही महत्त्वाची कामं करत, सूर्यप्रकाश झेलत दिया प्रत्येक दिवस मनमुरादपणे जगत आहे. 

यशशिखरावर पोहोचलेली ही सेलिब्रिटी ओळखली? 

फ्लोरल ड्रेस आणि कमीत कमी मेकअप असा एकंदर तिचा लूक या सेल्फीमध्ये पाहायला मिळत आहे. दिया आता या वर्क फ्रॉम होममध्ये नेमकी कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहे, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाही. 

2021 मध्ये फेब्रुवारी महिन्यातच दियानं वैभव रेखी याच्याशी लग्नगाठ बांधली होती. विवाहसोहळ्यानंतर काही दिवसांनीच दियानं आपल्या गरोदरपणाची माहिती दिली. एक सेलिब्रिटी म्हणून लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या दियाला या निमित्तानं सर्वांनी शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं होतं. आता हीच अभिनेत्री पुन्हा एकदा वर्क फ्रॉम होम करणाऱ्या अनेकांनाच कमालीची सकारात्मक उर्जा देत आहे, असंच म्हणावं लागेल.