Dr Mohan Agashe :  मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या राजकारणामुळे (Current Politics) अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्याच्या राजकारणातही अनपेक्षित घडामोडी, पक्ष फोडाफोडीचे प्रकार सुरू आहेत. सामान्यांकडून या त्रागा व्यक्त केला जात असताना दुसरीकडे ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे (Mohan Agashe) यांनीदेखील चिंता व्यक्त केली आहे. सध्याचं राजकारण मला खूप त्रास देतंय, पुढील पिढीची काळजी वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.


'तारांगण' या युट्युब चॅनलसोबत बोलताना ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी  एका प्रश्नाला उत्तर देताना सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. मोहन आगाशे यांनी म्हटले की, सध्याच्या राजकारणामुळे अस्वस्थ वाटत आहे. पुढील पिढीसाठी आपण काय सोडून जात आहोत,  याकडे कोणी लक्षात देत नाही. कदाचित या वाईटातून चांगलेही घडू शकते. जी अस्वस्थता मी अनुभवत आहे, तशी इतरही अनुभवत असतील. त्यामुळे पुढील पिढी यातून आणखी काही चांगले करेल असा आशेचा किरण असल्याचे मतही डॉ. आगाशे यांनी व्यक्त केले. 


राजकारणाचा धंदा झालाय... 


डॉ. मोहन आगाशे यांनी म्हटले की, राजकारणाचा आता धंदा झाला आहे.सगळ्याच नेत्यांकडून साफ निराशा झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राजकारण हा धंदा झाला आहे. त्यामुळे प्रामाणिक राजकारणींना याचा त्रास होत आहे. एखाद्या व्यवसायात समाजभान विसरलेले धंदेवाईक लोक शिरली की त्या क्षेत्राचे नुकसान होते, तसेच राजकारणाचे झाले असल्याचे परखड मत डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले आहे.  






 


लोकशाही चित्रपटात डॉ. मोहन आगाशे यांची महत्त्वाची भूमिका


सत्ता संघर्षाभोवती असलेला राजकीय नाट्य असलेला लोकशाही चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. घराणेशाहीत जगणाऱ्या प्रस्थापितांचा कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवण्याचा हव्यास आणि या सत्तासंघर्षात कोणाचातरी जीव जाणार आहे, पण कोणाचा जीव कोण घेणार या रहस्याचं कोडं चित्रपटात उलगडण्यात आले आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्यासह अंकित मोहन, गिरीश ओक, समीर धर्माधिकारी, भार्गवी चिरमुले, अमित रियान, शंतनु मोगे, प्रसन्न केतकर, सुश्रुत मंकणी, अजिता कुलकर्णी, सोनल वाघमारे  आदींच्या भूमिका आहेत. सुशीलकुमार अग्रवाल यांनी निर्मिती केली असून संजय अमर यांनी कथा, पटकथा आणि दिग्दर्शित केले आहे.