मुंबई : यंदाचा 'मिस इंडिया' चा खिताब जिंकला आहे तेलंगणाच्या मनसा वाराणसीला. मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये झालेल्या मिस इंडिया 2020 च्या ग्रँड फिनालेमध्ये 23 वर्षाच्या मनसानं बाजी मारली आहे. मनसानं आधी 15 आणि नंतर 5 स्पर्धकांवर मात करत हा खिताब आपल्या नावे केला. तिनं याआधी मिस तेलंगणा हा खिताबही जिंकला होता. आता 'मिस इंडिया' चा मान पटकावणारी ती तेलंगणामधील पहिली मुलगी ठरली आहे.



फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप हरियाणाची मनिका शोओकंद आणि उत्तर प्रदेशची मान्या सिंह या ठरल्या. मनिका 25 वर्षाची तर मान्या 19 वर्षांची आहे. या कार्यक्रमाला काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी देखील हजेरी लावली. अभिनेत्री वाणी कपूरनं यावेळी नृत्य सादर केलं तर अभिनेत्री चित्रांगदा सिंहनं जज म्हणून उपस्थिती दर्शवली.


या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेता अपारशक्ति खुरानानं केलं. तो यावेळी म्हणाला की, कोविड-19 महामारीच्या काळात आयोजित केलेल्या या स्पर्धेचा भाग बनता आलं त्यामुळं मी खूश आहे. याआधी मिस इंडिया ठरलेल्या अभिनेत्री नेहा धूपिया म्हणाली की, दिवसेंदिवस या स्पर्धेची रंगत वाढत आहे. यातील स्पर्धकांना मेन्टॉर करणं मला आवडतं आणि प्रत्येक स्पर्धकांचा आत्मविश्वास मला आवडतो, असं नेहा म्हणाली.