Amazon Prime Mirzapur 2 Review: अॅमेझॉन प्राईम व्हिडीओची मिर्झापूर वेब सीरिज ही दोन वर्षापूर्वी आली. प्रेक्षकांना हव्या असलेल्या सर्व गोष्टी या सीरिजमध्ये होत्या. कालिन भय्याच्या मार्गात जो कोणी येईल त्याला अत्यंत निर्दयीपणे संपवले गेले. यातील कलाकारांच्या भूमिकेमुळे मिर्झापूर ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता मिर्झापूर वेब सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन वर्षानंतर आता पुन्हा प्रेक्षकांना कालिन भय्या आणि त्याचा मुलगा मुन्ना भय्याची दहशत अनुभवायला मिळणार आहे. दुसऱ्या सीझनच्या पहिल्या दोन भागाला मिळालेल्या प्रतिसादावरुन त्याचा पहिला सीझन किती यशस्वी होता याची कल्पना येते. त्यातील कलाकारांच्या भन्नाट भूमिका, शिव्या आणि हिंसा यांचा खुबीने वापर आणि बरंच काही यात आहे. यावरुन यावेळीही मिर्झापूर आपल्या मुळाशी जोडला गेला आहे याची खात्री पटते.

Continues below advertisement


मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनमध्ये पहिल्या सीझनमधील अनेक घटनांची कारणं दाखवण्यात आली आहेत. त्यातील प्रत्येकाच्या डोक्यात कुणाला कसे मारायचे हे कशा पद्धतीने चाललंय हे उत्तम पद्धतीने दाखवण्यात आलं आहे. या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकांचा उद्देश हा आपला बदला घेणे हाच आहे हे आपल्याला काही क्षणातच समजते. याच्या पहिल्या सीझनमध्ये हिरोच्या भूमिकेची कमी होती ती या सीजनमध्ये श्वेता त्रिपाठीच्या गोलू आणि अली फजलच्या गुड्डू पंडित या व्यक्तिरेखांनी पूर्ण केली आहे.


दुसरा सीझन पाहताना प्रेक्षकांना कालिन भय्या आणि दिव्येंदू शर्मा यांच्यातील संभाषणाचा अर्थ कळण्यासाठी थोडं डोकं लावायला लागेल. कालिन भय्या हे मिर्झापूरच्या लोकांवर राज्य करायचे असेल तर काय करावे लागेल हे सांगत असतात. त्यांचा मुलगा मुन्ना भय्याला शहरावर राज्य करायचे असते. कालिन भय्याला आपल्या दहशतीचा वारसा टिकवायचा असतो तर गुड्डू पंडितला त्याच्या भावाच्या आणि बायकोच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या वृत्तीने पछाडले असते. त्याला या कामात गोलूची साथ लाभते. या सीझनमध्ये कालिन भय्या एका पित्याप्रमाणे वागतात, ज्यांना समजले असते की त्यांचा मुलगा मुन्ना हा त्याला हवी असलेली जबाबदारी पार पाडू शकणार नाही.


या सीझनची खरी जान ही अपेक्षेप्रमाणे पंकज त्रिपाठींची भूमिका आहे. त्यांचे संवाद आणि भेदक नजर आणि चेहऱ्यावरचे हावभाव हे सर्व काही प्रेक्षकांना भावते. त्याचसोबत श्वेता त्रिपाठीने गोलूची भूमिका ही अतिशय चमकदार पद्धतीने साकारलेली आहे. दिव्येंदू शर्मा आणि अली फजल यांनीही त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. तसेच शरदच्या भूमिकेत अंजुम शर्माने चांगले काम केले आहे.


उत्तर प्रदेशातील मिर्झापूर या शहरातील भ्रष्टाचार, गुन्हेगारी, माफिया राज, सरकारी यंत्रणेचे अपयश आणि गँग वॉर या सर्व गोष्टी या सीझनमध्ये दाखवण्यात आल्या आहेत. दुसऱ्या सीझनमध्ये पहिल्या सीझनपेक्षा अधिक हिंसा आणि अर्वाच्च भाषेचा वापर करण्यात आल्याचं दिसून येतं.