मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मिमी सिनेमाची चांगली चर्चा रंगली आहे. या सिनेमात मुख्य भूमिका आहे क्रिती सेननची. तर तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाची चर्चा अशासाठी की हा सिनेमा मराठी चित्रपटावर बेतला आहे. पण सोमवारी, अनपेक्षित रित्या एक घटना घडली आणि निर्मात्याने हा चित्रपट ठरलेल्या तारखेआधीच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. 


मिमी हा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपट मला आई व्हायचंय या मराठी चित्रपटावर बेतला आहे. विनोदी अंगाने हा चित्रपट जातो. मिमीचा ट्रेलरही बराच वाखाणला गेला आहे. शिवाय, क्रिती सेनन या अभिनेत्रीचा हा पहिलाच सोलो चित्रपट. हा चित्रपट खरंतर रिलीज होणार होता तो 30 जुलैला. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर येणार होता. पण सोमवारी या चित्रपटाच्या टीमला आपला चित्रपट टेलिग्रामवर लीक झाल्याचं कळलं आणि त्यानंतर या टीमने आपला निर्णय बदलला.  याबद्दल सिनेमाच्या टीमने लाईव्ह सेशन केल. इन्स्टाग्रामवर केलेल्या या सेशनमध्ये हा सिनेमा टेलिग्रामवर लीक झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर एकदा हा पायरसीचा फटका बसल्याचं लक्षात आल्यानंतर सिनेमाच्या सगळ्या टीमने तातडीने हा चित्रपट आजच रिलीज करायचं ठरवलं त्यानुसार सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी मिमी रिलीज झाला. या चित्रपटाच क्रिती सेनन, पंकज त्रिपाठी आणि सई ताम्हणकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. 






ओटीटीवर रिलीज होणारा चित्रपट लीक होणं आणि त्यामुळे ठरल्या तारखेपेक्षा तो आधीच रिलीज केला जाणं हे पहिल्यांदाच होतं आहे. याबद्दल या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, 'हा चित्रपट 30 तारखेला आम्ही रिलिज करणार होतो. पण दुर्दैवाने सोमवारी सकाळीच हा चित्रपट लीक होत असल्याचं आम्हाला कळलं. त्यानंतर हा चित्रपट नक्की कुठून लीक झाला आहे, हे शोधणं जवळपास अशक्य होतं. म्हणजे, एकदा चित्रपट लीक झाला की तो झपाट्याने व्हायरल होतो. असं असल्याने आमच्या टीमने हा चित्रपट प्रदर्शित करून टाकायचं ठरवलं आणि हा चित्रपट प्रदर्शित झाला.'


ओटीटीवर येणाऱ्या चित्रपटाची पुरती काळजी ते ते प्लॅटफॉर्म घेत असतं. पण असं असताना एका नामांकित प्लॅटफॉर्मवरचा चित्रपट रिलीज तारखेच्या चार दिवस आधी लीक होणं हे गंभीर असल्याचं मत सिनेवर्तुळात व्यक्त होतं आहे. असं झालं, तर अनेक मोठ्या चित्रपटांना धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होते आहे.