कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील यंदाच्या महापुरामध्ये नागरिकांचे कमीत कमी नुकसान झाले आहे. त्याचं कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात बसवलेली पब्लिक अॅड्रेस सिस्टीम...देशामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची सिस्टिम बसवली असून एकाच वेळी लाखो नागरिकांना या या सिस्टीमच्या माध्यमातून संदेश पोहोचवता येतो. 


कोल्हापूर जिल्ह्यातील पुरामध्ये प्रशासनाच्या मदतीला धावून आलेली यंत्रणा म्हणजे पब्लिक अॅड्रेस सिस्टीम...या सिस्टीममध्ये एकाच वेळी लाखो नागरिकांपर्यंत संदेश देता येतो. पालकमंत्री सतेज पाटील, तत्कालीन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या प्रयत्नातून ही सिस्टिम उभा राहिली. पुरामध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी, पंचगंगेची पाण्याची पातळी सांगण्यासाठी आणि वेळीच होण्याच्या सूचना देण्यासाठी ही यंत्रणा उपयोगी पडली आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात 129 ठिकाणे ही सिस्टिम बसवली आहे. 


काय आहे सिस्टीम?



  • गावामध्ये ग्रामपंचायतीच्या आवारात मोठा स्पीकर बसवलेला आहे.

  • या स्पीकर वर थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून संदेश मिळतो.

  • मोबाईलवरून ही सिस्टीम ऑपरेट करता येते, त्यामुळे सुलभता आहे,

  • जिल्ह्यातील प्रमुख चार अधिकाऱ्यांना अधिकार दिल्याने योग्य वेळी योग्य संदेश पोहोचतो.

  • महापुरात या सिस्टीमचा खूप फायदा झाला आहे


 ही यंत्रणा केवळ जिल्ह्यातील चारच अधिकारी वापरू शकणार आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालिका आयुक्त यांनाच या सिस्टीम वरून नागरिकांना संदेश देता येतो. महापुराबरोबरच इतर अत्यावश्यक सेवेत या सिस्टीमचा उपयोग प्रशासनाला करता येणार आहे.


कोल्हापूर जिल्ह्यात ही यंत्रणा बसवल्यामुळे प्रशासनाचे काम खूप कमी झाले आहेत. अजून 400 ठिकाणे ही सिस्टीम बसवण्याचे बाकी आहे. आतापर्यंत बसवलेल्या सिस्टीममधून साडे तीन लाख नागरिकांपर्यंत एकाच वेळी संदेश पोहोचवला आहे. प्रत्येक गाव निहाय देखील संदेश पोहोचवण्याची व्यवस्था या सिस्टीममध्ये केली आहे. अशा प्रकारची सिस्टीम इतर जिल्ह्यांमध्ये बसवली तर संकट काळात खूप मदत होऊ शकते.