Masaba Gupta Married Satyadeep Misra : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ताची (Neena Gupta) लेक अभिनेत्री मसाबा गुप्ता (Masaba Gupta) नुकतीच सत्यदीप मिश्रासोबत (Satyadeep Misra) लग्नबंधनात अडकली आहे. मसाबा आणि सत्यदीप दोघांचही हे दुसरं लग्न आहे. मसाबाने सोशल मीडियावर सत्यदीप सोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना लग्नाची माहिती दिली आहे. 

Continues below advertisement


सत्यदीप मिश्रा कोण आहे? 


सत्यदीप मिश्रा एक अभिनेता आहे. 'विक्रम वेधा' या सिनेमात तो शेवटचा दिसला होता. या सिनेमात तो ऋतिक रोशन आणि सैफ अली खानसोबत झळकला होता. 'नो वन किल्ड जेसिका' या सिनेमातील सत्यदीपच्या कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. 'बॉम्बे वेलवेट', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'फोबिया' अशा अनेक सिनेमांत सत्यदीपने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 


'मसाबा मसाबा' या वेबसीरिजमध्ये सत्यदीपने मसाबासोबत काम केलं होतं. नेटफ्लिक्सची ही सीरिज मसाबाच्या आयुष्यावर आधारित होती. या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान मसाबा आणि सत्यदीपची ओळख झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अखेर मसाबा आणि सत्यदीप आता लग्नबंधनात अडकले आहेत. 






मसाबाने शेअर केला फोटो...


मसाबाने सत्यदीपसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं आहे, "आज सकाळी शांत महासागराशी मी लग्न केलं आहे. या महासागरात प्रेम, शांतता, स्थिरता आणि हास्य आहे". मसाबाच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. मसाबा आणि सत्यदीपचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 


मसाबा गुप्ता 2015 साली सिने-निर्माता मधु मंटेनासोबत लग्नबंधनात अडकली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर 2019 साली ते विभक्त झाले. तर दुसरीकडे सत्यदीप मिश्रा 2009 साली अभिनेत्री आदिती राव हौदरीसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण 2013 साली त्यांचा घटस्फोट झाला.


मसाबा गुप्ताच्या लग्नसोहळ्यातील लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. मसाबा अभिनेत्री असण्यासोबत एक उत्तम फॅशन डिझायनर आहे. मसाबाने लग्नसोहळ्यात गुलाबी रंगाचा लहेंगा परिधान केला होता. तर सत्यदीपने सिल्कची शेरवानी परिधान केली होती. सोन्याचे दागिणे तिच्या लूकला चार चांद लावले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Exclusive : ना 50 कोटींचं घर... ना महागड्या भेटवस्तू, राहुल-अथियाला मिळालेल्या गिफ्टबाबत सुनील शेट्टीने स्पष्ट सांगितले