Marathi Movie Updates Punha Duniyadari :  मोठ्या कालावधीनंतर मराठी चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर कोटींच्या कमाईचे आकडे दाखवणारे दिग्दर्शक संजय जाधव (Sanjay Jadhav) पुन्हा एकदा दुनियादारीचा (Duniyadari) डाव रंगवणार आहे. संजय जाधव यांनी सई ताम्हणकर (Sai Tamhankar), स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) यांना सोबत घेऊन 'पुन्हा दुनियादारी' चित्रपटाची घोषणा केली आहे. 'पुन्हा दुनियादारी'च्या (Punha Duniyadair) निमित्ताने निर्मात्या उषा काकडे हे अमेय विनोद खोपकर पिक्चर्स, स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासोबत एकत्र आल्या आहेत. 


काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि संजय जाधव ही जबरदस्त टीम अकरा वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर  या चित्रपटाची चर्चा रंगली होती. अनेक तर्कवितर्कही काढले जात होते. परंतु आता या सगळ्यावरील पडदा उठला असून अखेर या चित्रपटाचे नाव अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. 'पुन्हा दुनियादारी’ असे या चित्रपटाचे नाव असून ‘दुनियादारी’तील मैत्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. 'पुन्हा दुनियादारी'मध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी  पाहायला मिळणार आहे. मात्र, 'दुनियादारी' चित्रपटातील 'कट्टा गँग'ही एकत्र येणार का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.


‘पुन्हा दुनियादारी’च्या निमित्ताने निर्मात्या उषा काकडे यांनी अमेय विनोद खोपकर, स्वाती खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्यासोबत असोसिएशन केले आहे. उषा काकडे यांनी नुकतेच उषा काकडे प्रोडक्शन सुरु केले असून त्या आगामी  'विकी : फुल्ल ऑफ लव्ह' या मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत.  याव्यतिरिक्त त्या व्यावसायिका आणि समाजसेविका म्हणूनही कार्यरत आहेत. एवीके पिक्चर्स, उषा काकडे प्रोडक्शन्स, मैटाडोर प्रोडक्शन,  व्हिडीओ पॅलेस निर्मित प्रदर्शित होणाऱ्या 'पुन्हा दुनियादारी' या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा संजय जाधव यांच्याकडे आहे. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, उषा काकडे, नानूभाई जयसिंघानी, निनाद बत्तीन निर्माते आहेत.


या चित्रपटाबाबत निर्माते अमेय खोपकर यांनी म्हटले की, "2013 मध्ये 'दुनियादारी' आल्यानंतर त्याचा गाजावाजा आणि प्रसिद्धी पाहाता 'पुन्हा दुनियादारी' ची उत्सुकता रसिकवर्गाला लागली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा ही मैत्री प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचे त्यांनी सांगितले. कलाकार, दिग्दर्शक, निनाद बत्तीन आणि संपूर्ण टीमसोबत माझे ऋणानुबंध आहेत. या टीमसोबत काम करताना अतिशय आनंद होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त  केली. 


निर्मात्या उषा काकडे यांनी सांगितले की, "दुनियादारी ही माझी सर्वात आवडती फिल्म आहे. या फिल्मचा दुसरा पार्ट येतोय आणि मी या फिल्मची निर्मिती करतेय याचा मला प्रचंड आनंद  असल्याचे त्यांनी सांगितले. 


दिग्दर्शक संजय जाधव यांनी सांगितले की, "शिरीन, श्रेयस, दिघ्या या मैत्रीचा संगम परत 'पुन्हा दुनियादारी' च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 11 वर्षांची आतुरता संपत अखेर 'पुन्हा दुनियादारी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. विविध प्रोजेक्ट्च्या निमित्ताने या सगळ्यांसोबत काम केले. परंतु पुन्हा एकदा या टीमसोबत एकत्र काम करण्याची मजाच और आहे. हे बॉण्डिंग इतके स्ट्रॉन्ग आहे की, त्याचे प्रतिबिंब 'पुन्हा दुनियादारी' मध्ये निश्चितच दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.