Medium Spicy movie : कोरोना साथीमुळे आणि त्यानंतर सर्वांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. या बदलेल्या जीवनशैलीमध्ये प्रत्येक जण स्वतःला समजून घेण्याबरोबरच नाती जपणे, लग्न-मैत्रीतील गुंतागुंत सोडवणे व नाती निभावणे यातून स्वतःला सावरून घेण्याचा प्रयत्न करत आहे. शहरी जीवनातील मानवी नातेसंबंध, प्रेम आणि विवाह या बद्दल खुसखुशीत भाष्य करणारा लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत उत्तम कलाकारांची मांदियाळी आणि संवेदनशील अभिनय असलेला ‘मीडियम स्पाइसी’ (Medium Spicy) येत्या 17 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.


विधि कासलीवाल निर्मित, इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर (Sai Tamhankar), ललित प्रभाकर (Lalit Prabhakar), पर्ण पेठे (Parna Pethe), सागर देशमुख (Sagar Deshmukh), नेहा जोशी (Neha Joshi), पुष्कराज चिरपुटकर (Pushkaraj Chirputkar), इप्शिता यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.



मोठी स्टारकास्ट आणि नाविन्यपूर्ण विषय यामुळे ‘मीडियम स्पाइसी’ बद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे.


प्रयोगशील युवा नाटककार मोहित टाकळकर मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड भाषिक रंगभूमीवरील प्रसिद्ध आणि आघाडीचे नाव आहे, तसेच एक उत्तम संकलक म्हणूनही त्यांना चित्रपटसृष्टीत ओळखले जाते, ‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. तर विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्सने यापूर्वी वैविध्यपूर्ण चित्रपटांची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. यामध्ये ‘सांगतो ऐका’, ‘वजनदार’, ‘रिंगण’, ‘गच्ची’, ‘रेडू’, ‘नशीबवान’, ‘पिप्सी’ अशा दर्जेदार चित्रपटांचा समावेश आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’ येत्या 17 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha