Marathi Movie Lifeline Trailer Ashok Saraf :   डॉक्टरांचे आधुनिक विचार आणि किरवंतामध्ये खोलवर रुजलेली परंपरेची मुळे या दोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा 'लाईफलाईन'चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि माधव अभ्यंकर ( Madhav Abhyankar) यांच्या अभिनयाची जुगलबंदी रंगणार आहे. डॉक्टर आणि किरवंताचा संघर्ष या चित्रपटात दिसणार आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच कार्यक्रम पार पाडला. अशोक सराफ, माधव अभ्यंकर, भरत दाभोळकर, हेमांगी कवी, जयवंत वाडकर, शर्मिला शिंदे, सुश्रुत मंकणी, अवधूत गुप्ते यांच्या उपस्थितीत नुकताच 'लाईफलाईन' चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. 


 ट्रेलरमध्ये डॉक्टर आणि किरवंतामधील संघर्ष दाखवण्यात आला आहे.  ज्ञान आणि विज्ञान एकत्र आले तर कित्येक गरजूंचे प्राण वाचू शकतील, या मताचे डॉक्टर आहेत. तर, माणसाच्या आयुष्यात दोनच जण महत्वाचे असतात, एक भगवंत जो जन्म देऊन खाली पाठवतो आणि दुसरा किरवंत जो निरोप देऊन वर पाठवतो, या विचारसरणीचे किरवंत आहेत. या दोघांच्या संघर्षात अनेक टप्पे येतात. डॉक्टर की किरवंत, कोणाचा विजय होईल,  कोणाची बाजू योग्य ठरेल हे चित्रपटात दिसणार आहे. 


चित्रपटाबद्दल दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी सांगितले की, " दिग्दर्शक म्हणून हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि पहिल्याच चित्रपटात अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांसारखे दिग्गज कलाकार असणे, ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्टी असल्याचे त्यांनी म्हटले. व्यक्तिरेखा ठरल्यावर ज्यावेळी कलाकारांची निवड करण्याची वेळी आली, तेव्हा माझ्या मनात ही दोन नावे आधी आली. त्यानुसार मी अशोक सराफ सरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांच्या समोर अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट्स होत्या. सरांनी मला विचारले, एवढे चित्रपट असताना मी या चित्रपटाला होकार का द्यावा? यावर मी माझी स्क्रिप्ट त्यांना वाचून दाखवली आणि त्यामागची माझी भावनाही पटवून दिली. सरांचा होकार माझ्यासाठी फार आनंदाची बाब होती अशी भावना साहिल यांनी व्यक्त केली. चित्रपटाबद्दल सांगायचे तर आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेमध्ये अडकलेला हा वाद आहे. आता या वादाचा शेवट कसा होतो, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे. 'लाईफलाईन'च्या निमित्ताने सामाजिक जनजागृती करण्याचा प्रयत्न केला असून माझा हा प्रयत्न प्रेक्षकांना आवडेल असा विश्वासही दिग्दर्शक साहिल शिरवईकर यांनी सांगितले.


ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी सांगितले की,''ज्यावेळी साहिलने मला चित्रपटाबद्दल सांगितले, त्यावेळी स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी त्याला पहिला प्रश्न विचारला किरवंताची व्यक्तिरेखा कोण साकारणार आहे, त्यावेळी त्याने माधव अभ्यंकर यांचे नाव घेतले. तिथेच मला या मुलाची समज कळली. मला हा विषय आवडला. प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडणारा हा चित्रपट आहे. एक तरूण दिग्दर्शक असा चित्रपट बनवतोय, ही निश्चितच कौतुकाची बाब असल्याचे अशोक सराफ यांनी सांगितले. 


'लाईफलाईन' चित्रपटाचे दिग्दर्शन साहिल शिरवईकर यांनी केले आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद राजेश शिरवईकर यांचे आहेत. तर अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांना अवधूत गुप्ते आणि माधुरी करमरकर यांनी स्वर दिला आहे. लालजी जोशी, कविता शिरवईकर, अमी भुता, मिलिंद प्रभुदेसाई, उदय पंडित, संचिता शिरवईकर, संध्या कुलकर्णी, शिल्पा मुडबिद्री आणि क्रिसेंडो एंटरटेनमेंट चित्रपटाचे निर्माते आहेत.