मुंबई : दिग्दर्शक रवी जाधव नेहमीच काहीतरी नवं करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने आजवर केलेले चित्रपट पाहिले तर सातत्याने काहीतरी नवा प्रयोग करण्याची त्याची धडपड, उर्मी त्यात दिसते. नटरंग, बीपी, मित्रा, टाईमपास आदी चित्रपटातून त्याची प्रयोगशीलता दिसली. आता त्याने नवा प्रोजेक्ट हाती घेतला आहे.
या बद्दलची माहिती रवी जाधवने फेसबुकवर दिली आहे. त्या पोस्टमध्ये 'हर हर महादेव' असं म्हणत आपण नव्याने काही सुरू करत असल्याचं सुतोवाच त्यानं केलं आहे. ही पोस्ट करतानाच, त्याने एक कृष्ण-धवल फोटोही पोस्ट केला आहे. त्यात शिवरायांच्या पायाला तो हात लावून नमन करून आशीर्वाद घेत असल्याचं दिसतं. या फोटोत ते हात नेमके कुणाचे आहेत ते कळत नाही. पण पायांवरून ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चरण आहेत यात शंका वाटत नाही.
https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=10157328186411175&id=694361174
रवी जाधव यांनी काही वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांवरच्या एका चित्रपटाची झलक दाखवली होती. त्यात अभिनेते रितेश देशमुख शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार अशी चर्चा होती. तो चित्रपट भव्य चित्रपट असणार आहे. तोच हा चित्रपट आहे का, याबद्दल साशंकता आहे. कारण, रितेश देशमुखने नागराज मंजुळेसोबत शिवरायांवरचे तीन चित्रपट करायचं निश्चित केलं आहे. रवी जाधव आता नक्की काय करणार याकडे मात्र यानिमित्ताने लक्ष लागून राहिलं आहे.