Actress Usha Chavan Shares Angry Post: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) दिग्गज, ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे, उषा चव्हाण (Actress Usha Chavan). 1970 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांत (Marathi Movie) दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. विशेषतः अभिनेते दादा कोंडके (Actor Dada Kondke) यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रचंड गाजली. उत्तम अभिनय, नृत्य आणि सौंदर्याच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत त्याचं अढळ स्थान निर्माण केलं. अभिनयासोबतच त्यांनी आपलं सहजसुंदर व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी अभिनयशैलीमुळे मराठी सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. आजही त्या विविध सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आपलं मत मांडताना दिसतात. सध्या त्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करत पुण्यातील (Pune News) त्यांच्या जमिनीच्या वादाबाबत पुन्हा आवाज उठवला आहे. 

Continues below advertisement

धनकवडी परिसरात उषा चव्हाण यांची जमीन असून, या जागेसंदर्भातील वादामुळे त्या मागील 26 वर्षांपासून त्रास सहन करत असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे. या प्रकरणात मार्च 2026 मध्ये मुंबई उच्च न्यायालयानं त्यांच्या बाजूनं निर्णय दिला होता. मात्र, आता या प्रकरणानं पुन्हा नवं वळण घेतल्याचं समोर आलं आहे. आपल्या पोस्टमध्ये एका वयोवृद्ध कलाकार स्त्रीला, जिनं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी दिलं, तिलाच स्वत:च्या हक्कासाठी इतकी वेदनादायक लढाई लढावी लागत असेल तर सामान्य मराठी कुटुंबाची परिस्थिती किती भयानक असेल, याचा विचारही करवत नाही, असं ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण म्हणाल्या आहेत. 

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काय म्हटलंय? 

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण म्हणाल्या की, "मी ज्येष्ठ मराठी अभिनेत्री उषा चव्हाण, अत्यंत वेदनादायी परिस्थितीत महाराष्ट्रातील जनतेसमोर माझी भूमिका मांडत आहे. माझ्या कुटुंबियांच्या मालकीच्या व न्यायालयीन वादातील संपत्तीबाबत मा. उच्च न्यायालयाने दि. 4. 3. 2026 रोजी स्पष्टपणे नमुद केलं आहे की, सदर मालमत्ता अद्याप अविभाजित असून माझा मुलगा श्री हृदयनाथ कडू देशमुख त्यामध्ये कायदेशीर अस्तित्वात आहे. तसेच दि. 20. 10. 2023 रोजी सुमारे 13,546 चौ.मी टीडीआर संदर्भात माझ्या बाजूचे हक्क मान्य झालेले असताना देखील पुणे महानगरपालिकेनं अचानकपणे संपूर्ण 15,066 चौ. मी टीडीआर हे एका बिल्डर कंपनीच्या फायद्यासाठी देण्याची कार्यवाही केली आहे. पुढे या प्रेसनोटमध्ये डीसीआर क्रमांक नमुद करत म्हटलंय, मालकील हक्क, प्रलंबित वाद आणि माझ्या लेखी हरकती पूर्णपणे डावलून जारी करण्यात आले आहेत..." 

Continues below advertisement

एका वयोवृद्ध कलाकार स्त्रीला... : अभिनेत्री उषा चव्हाण (Actress Usha Chavan Post)

"मी वारंवार संबंधित अधिकारी, मा. पंतप्रधान कार्यालय,मा, मुख्यमंत्री, नगरविकास विभाग तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. मात्र, माझं म्हणणं, कायदेशीर हक्क, आणि न्यायालयीन आदेश दुर्लक्षित करण्यात आले. जर नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या यंत्रणांनीच अशा प्रकारे वर्तन केलं, तर सामान्य माणसानं न्यायासाठी कोणाकडे पाहायचं? हा प्रश्न आज निर्माण झाला आहे. एका वयोवृद्ध कलाकार स्त्रीला, जिनं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी दिलं, तिलाच स्वत:च्या हक्कासाठी इतकी वेदनादायक लढाई लढावी लागत असेल तर सामान्य मराठी कुटुंबाची परिस्थिती किती भयानक असेल, याचा विचारही करवत नाही...", असं उषा चव्हाण म्हणाल्या आहेत. 

महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसाच्या मालमत्ता हक्कांचे संरक्षण होईल का? : अभिनेत्री उषा चव्हाण (Marathi Actress Usha Chavan)

पुढे बोलताना उषा चव्हाण यांनी म्हटलंय की, "आज मला अत्यंत दु:खानं सांगावं लागत आहे की, महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसाच्या मालमत्ता हक्कांचे संरक्षण होईल का? याबाबतच प्रश्न निर्माण झाला आहे. कडू कुटुंबियांचा भाग नसलेल्या बिल्डर संस्थेला संपूर्ण विकास हक्क देऊन मूळ मालकांना संघर्ष करायला लावणं कोणत्याही न्यायप्रिय समाजाला शोभणारं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय, स्वाभिमान आणि रयतेच्या हक्कासाठी संघर्ष केला. आज पुन्हा सामान्य नागरिकांना स्वत:च्या हक्कासाठी तशाच प्रकारे लढावं लागतंय का? असा गंभीर प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे..."

उषा चव्हाण यांच्याकडून सरकारचा निषेध

"महाराष्ट्र शासनानं 1970 पासून माझ्या कला क्षेत्रातील योगदानाबद्दल मला अनेक पुरस्कार, ट्रॉफीज आणि सन्मान दिले. मात्र, जर न्यायलयीन आदेश असूनही माझे हक्क सुरक्षित राहणार नसतील, तर अशा सन्मानांचे माझ्यासाठी काही मूल्य उरत नाही. म्हणून मी महाराष्ट्र शासनाने मला दिलेले पुरस्कार, मानचिन्हे आणि ट्रॉफीज आणि प्रमाणपत्रे परत करण्याच्या निर्णय घेत आहे. आवश्यकता भासल्यास ती स्वत: स्व. आनंद दिघे साहेबांच्या समाधीस्थळी अर्पण करून माझा निषेध व्यक्त करेन...", असं म्हणत मराठी अभिनेत्री उषा चव्हाण यांनी निषेध व्यक्त केला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Tamil Actress Simran Blamed On Bollywood: 'साऊथच्या कलाकारांना मान-सन्मान मिळत नाही...', तमिळ अभिनेत्रीचा बॉलिवूडवर खळबळजनक आरोप, नेमकं काय म्हणाली?