Dipti Lele : 'अबोली' ही सिरियल, 'पत्त्यांचा बंगला' सारखं व्यावसायिक नाटक, 'रविवार डायरीज' सारख्या प्रायोगिक नाटक अशा कलाकृतींमधून महत्त्वाच्या भूमिका साकारणारी चतुरस्त्र अभिनेत्री दीप्ती लेले आता बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे. 4 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणाऱ्या 'फोन भूत' या सिनेमात दीप्ती दिसणार आहे. गुरमीत सिंगद्वारे दिग्दर्शित आणि रविशंकरन-जसविंदर सिंग बाथ लिखित, ‘फोन भूत’या सिनेमाची निर्मिती एक्सेल एंटरटेनमेंटचे प्रमुख रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांनी केली आहे.
बॉलिवूडमधल्या एन्ट्रीबाबत दिप्ती लेले समाधानी आहे. दीप्ती लेले सांगते, "बॉलिवूडचे सिनेक्षेत्र हे खूप मोठे आहे. तिथे काम करायला मिळणे हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. माझंही होतं. 'फोन भूत'च्या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण झालं आहे. सिनेमातील माझी भूमिका छोटी असली तरी महत्त्वपूर्ण आहे. सिनेमासाठी दिग्दर्शकाला मराठी चेहरा हवा होता. यासाठी माझी रीतसर ऑडिशनमधून निवड झालेली आहे. कॅटरिना कैफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्या महत्वपूर्ण भूमिका असणाऱ्या या सिनेमात त्यांच्याबरोबर आपल्याला काम करायला मिळणे यापेक्षा अजून काय हवंय? त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा चांगला होता. माझ्या भूमिकेविषयी अधिक विस्ताराने बोलण्यापेक्षा 4 नोव्हेंबरला सिनेमा बघा." असं दीप्ती म्हणाली.
दीप्तीचं शालेय शिक्षण पुण्यात झालं आहे. तसेच ती अभिनेत्रीबरोबरच व्यावसायाने 'आर्किटेक्ट' आहे. दीप्तीच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ही 'झी मराठी' वरील 'तुझं माझं जमेना' या मालिकेपासून झाली. त्यानंतर दीप्ती 'स्टार प्रवाह'वरील 'लगोरी मैत्री रिर्टन्स' या मालिकेमधून दिसली. त्यात दीप्तीने 'ऋतुजा' नावाची भूमिका साकारली होती. या दोन मालिकेनंतर दीप्तीने मागे वळून पहिलेच नाही. 'आम्ही दोघे राजा राणी', 'सांग तू आहेस का?', 'ती फुलराणी', 'माझीया माहेरा' ,सारख्या मालिकांमधून दीप्ती घरांघरात पोहोचली आहे. 'सायकल', 'भाई व्यक्ती की वल्ली', 'होम स्वीट होम', 'शिवाजी पार्क', 'मिस यू मिस्टर', 'पांघरुण' सारख्या अनेक सिनेमांमधून, 'चॅलेंज'सारख्या महत्त्वाच्या नाटकांमधून दीप्तीने महत्त्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत.
तेव्हा दीप्तीच्या बहुआयामी अभिनयाचा बॉलिवूडमधील ठसा कसा उमटला हे पाहण्यासाठी 'फोन भूत' हा सिनेमा सिनेमागृहात जाऊन बघायला हवा.
महत्वाच्या बातम्या :