Marathi Actress Chhaya Kadam Got Filmfare Award: आपण बऱ्याचदा सिनेमे मोठ्या स्टार्समुळे पाहतो. पण कधीकधी असे चित्रपट असतात, जे काही पात्रांमुळे आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आपल्याशी जोडले जातात. असे कलाकार गर्दीतून वेगळे दिसतात, कारण ते त्यांच्या अभिनयानं कथेत खोली भरतात. त्यांची उपस्थिती चित्रपटाच्या आत्म्याला भर घालते, त्यांची भूमिका कितीही लहान असली तरीसुद्धा ते लक्ष वेधून घेतात. अशी एक अभिनेत्री म्हणजे, छाया कदम (Chhaya Kadam). मराठमोळी अभिनेत्री (Marathi Actress) असूनही आज हिंदी सिनेमांमध्येही (Hindi Movie) त्यांनी उल्लेखनिय भूमिका साकारल्यात. एवढंच काय तर, एकाही सिनेमात लीड रोल न करता या अभिनेत्रीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. 

Continues below advertisement


दिग्गज कलाकार, चमकतं रेड कार्पेट आणि 70 वा हिंदी फिल्मफेअर पुरस्कार... फिल्म फेअर पुरस्कार सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात संपन्न झाला आणि याच खास सोहळ्यात ग्लोबल स्टार अभिनेत्री 'छाया कदम' यांची 2 स्वप्न देखील पूर्ण झालीत. 


अभिनयाच्या जोरावर छाया कदम यांनी जागतिक पातळीवर स्वतःची अनोखी ओळख निर्माण केली. बॉलिवूडमध्ये देखील त्यांच्या कामाचं कौतुक होताना दिसतं. सगळ्या भूमिकांमधली त्यांची 'लापता लेडीज'मधली भूमिका भाव खाऊन गेली आणि याच भूमिकेसाठी छाया कदम यांना बॉलिवुडचा किंग शाहरुख खानकडून सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झाला.  






मिळालेल्या फिल्मफेअरबद्दल बोलताना छाया कदम म्हणाल्या की, "लापता लेडीज़ सारख्या हिंदी चित्रपटासाठी हा पहिला वहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळणं, ही भावना कमालीची आहे. जेव्हा मी पुरस्कार स्विकारायला फिल्म फेअरच्या मंचावर गेले, तेव्हा आज एक नाही दोन मोठी स्वप्नं पूर्ण झालीत... बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खान सरांकडून एक कडकडीत मिठी मिळणं आणि दुसरं ब्लॅक लेडी घरी घेऊन जाणं... लापता लेडीज या चित्रपटानं मला अशी कहाणी सांगण्याची संधी दिली, जी अनेकांच्या हृदयाला स्पर्शून गेली. दिग्दर्शिका किरण राव, संपूर्ण टीम आणि प्रेक्षकांनी माझ्या कामाला ज्या ऊबदारपणे स्वीकारलं त्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. हा फिल्मफेअर पुरस्कार फक्त माझा नाही, तो प्रत्येक त्या स्त्रीचा आहे, जी सीमारेषांच्या पलीकडे स्वप्न पाहायची हिंमत करते..." 


जागतिक पातळीवर जाऊन सगळ्यांचा लाडक्या छाया कदम यांनी आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आणि येणाऱ्या काळात देखील अजून उत्तम कथा, चित्रपट भूमिका घेऊन त्या लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.


छाया कदम यांच्या सिनेमांबाबत बोलायचं झालं तर, 'फँड्री', 'सैराट', 'न्यूड', 'जुड', 'गंगूबाई काठियावाडी', 'लापता लेडीज', आणि 'मेडगाव एक्सप्रेस' यांचा समावेश आहे. तिनं 'हुतात्मा' या वेब सिरीज आणि 'मेरे साई' या टीव्ही शोमध्येही प्रभावी भूमिका केल्या आहेत. तसेच, छाया कमद यांना 'न्यूड'साठी महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळालेला.