मुंबई : मराठी सिनेसृष्टीत आतापर्यंत अनेक मोठ्या आणि अजरामर कलाकृती होऊन गेलेल्या आहेत. विशेष म्हणजे याच मराठी मातीतून जन्माला आलेले काही कलाकार तर असे आहेत, ज्यांनी अभिनय क्षेत्रात आपली स्वत:ची एक वेगळी छाप सोडलेली आहे. मात्र सोशल मीडियावर मुरलेल्या कलाकारांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. याच बड्या कलाकारांच्या यादीत प्राधान्यक्रमाने नाव घेतलं जाणाऱ्या ऐश्वर्या नारकर यांनादेखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. स्लिव्हलेस ब्लाऊज घातले म्हणून लोकांनी त्यांना ट्रोल केलं होतं. मात्र याच ऐश्वर्या नारकर यांनी ट्रोल करणाऱ्यांना सणसणीत उत्तर दिलंय. विकृती कमी झाली पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय. 


सीतेनं कंचुकी वापरलीच होती ना


ऐश्वर्या नारकर यांनी आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यांनी या मुलाखतीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. याच मुलाखतीत त्यांनी इन्स्टाग्रामच्या एका रिलमुळे झालेल्या ट्रोलिंगचा किस्सा सांगितला. "मी सत्यनारायणाच्या पूजेचं एक रिल टाकलं होतं. त्या रिलवरील कमेंट्स पाहून मला वाटलं की वाईट कमेंट्स करणाऱ्या लेक आणि सुनांचं काय होत असेल. काय आपले दंड दाखवायचे, आपली मराठी संस्कृती काय आहे? अशा प्रकारे मला ट्रोल करण्यात आलं. सीतेनं कंचुकी वापरलीच होती ना. तेवा मात्र ती फॅशन नव्हती. तेव्हा ती गरज होती. अंग झाकायला काहीतरी कपडे आहेत, असा विचार त्यामागे होता. आपल्याकडे आता तशी फॅशन आली आहे.मात्र फॅशन आली असली तरी आपल्याकडे कोणी उघडनागडं फिरलेलं नाही. जे कोणी उघडे फिरत असतील तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे," असं ऐश्वर्या नारकर म्हणाल्या.




ही विकृती कमी झाली पाहिजे


तसेच, "लोकांना उघडं-नागडं बघायला आवडतं. पण ही विकृती आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. सोशल मीडिया खूप छान आहे. त्यानून खूप चांगलं काही निर्माण होऊ शकतं. मी प्राणीमित्र आहे. प्राण्यांना वाईट पद्धतीने वागवले जाऊ शकते. एखाद्या स्त्री किंवा मुलीवर अन्याय होत असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आवाज उठवू शकतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्याचं आयुष्य, कुटुंब उभं करण्यास मदत करता येते. मात्र सोशल मीडियाचा घाणेरडा उपयोग केला जातो. तुमचं हेच दिसतं, तुमचं तेच दिसतं, असं सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. ही विकृती कमी झाली पाहिजे," असं मतही त्यांनी व्यक्त केलंय. 


हेही वाचा :


Sangee Movie Trailer Released: मैत्री की पैसे? काय महत्त्वाचं? उलगडणार मित्रांची अनोखी कथा 'संगी'मधून; चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित


Karan Johar Dating: कुणाला डेट करतोय प्रसिद्ध निर्माता करण जोहर? फिल्ममेकरनं स्वतःच केला खुलासा, सारेच झालेत अवाक्