मुंबई :  मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर (Hindi Marathi Film) आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी 'चतुरस्त्र अभिनेत्री' म्हणून आसावरी जोशी (Aasavari Joshi) यांची ओळख आहे. अभिनय क्षेत्रात आपली पहिली इनिंग खेळणाऱ्या आसावरी जोशी आता राजकारणात प्रवेश करणार आहेत. आसावरी जोशी 15 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. आसावरी जोशींनी अनेक हिंदी, मराठी चित्रपट, मालिका आणि जाहिरातींमधून अभिनय केला आहे. सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरी लोकप्रिय असलेल्या 'स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा' या मालिकेत त्या प्रा. अदिती सुर्यवंशीची लोकप्रिय भूमिका साकारत आहेत. नव्वदच्या दशकात 'सर्फ अल्ट्रा'च्या जाहिरातीतील 'ढूंढते रह जाओगे' हा  त्यांचा डायलॉग लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता. 


आसावरी जोशींनी अभिनयातून रोवला मैलाचा दगड : 


आसावरी जोशींनी जवळपास गेल्या चार दशकांपासून आपल्या अभिनयानं कलाक्षेत्राला समृद्ध केलं आहे. मराठी, हिंदी चित्रपट, मालिका, नाटकं आणि जाहिरातींमधून त्यांच्या सकस अभिनयानं प्रेक्षकांमध्ये त्यांचा स्वतंत्र चाहतावर्ग निर्माण झाला. अनेक चित्रपट आणि मालिकांमधून त्या घरा-घरांत पोहोचल्यात. 


1986 मध्ये आलेल्या 'माझं घर, माझा संसार' या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पन केलं होतं.  या चित्रपटात त्यांनी साकारलेली सुमनची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली होती. 2001 मध्ये दुरचित्रवाणीवरील 'ऑफिस-ऑफिस' या हिंदी मालिकेतील त्यांच्या अभिनयाची मोठी चर्चा झाली होती. त्यांनी 'सुवरी' या नाटकात अभिनय केला होता. त्यांचा पहिला बॉलीवूड चित्रपट 'प्यार जिंदगी है' हा होता. जोशी यांनी 1989 मध्ये 'धाम धूम' आणि 'एक रात्र मंतरलेली' या चित्रपटांत काम केले. तर 1991 मध्ये ‘गोडी गुलाबी’ या मराठी चित्रपटातही त्यांनी अभिनय केला आहे. आसावरी जोशी यांची 1993 मध्ये दुरदर्शनवर आलेली मालिका 'जबान संभालके' मालिकेतील कन्याकुमारीची भूमिका फारच गाजली होती. 'सुखी संसाराराची 12 सुत्रे' आणि 'बाल ब्रह्मचारी' यासारख्या चित्रपटांचाही  आसावरी या भाग होत्या. त्यांची 'फॅमिली नंबर 1' या मालिकेतील शालिनीची भूमिकाही फार गाजली होती.


 2001 मध्ये जोशी यांनी 'प्यार जिंदगी है' चित्रपटात काम केलेय. यासोबतच 'वक्त: द रेस अगेन्स्ट टाइम' या चित्रपटातही त्यांनी अभिनय केला होता. आसावरी ‘मंथन: एक अमृत प्याला’ चा भाग होत्या. यासोबतच 'स्टार वन'वरील 'नया ऑफिस ऑफिस' या मालिकेतही त्यांनी अभिनय केला. जोशी यांनी 'हॅट्रिक', 'ओम शांती ओम', 'हम, तुम और घोस्ट', 'हॅलो डार्लिंग', ‘शगीरद’ आणि ‘समर्थ’ या चित्रपटांत काम केले आहे. यासोबतच आसावरी जोशी यांनी 'एका लग्नाची दुसरी गोष्ट” आणि 'मला सासू हवी' या मालिकांमधूनही अभिनय केला. यासोबतच अलिकडच्या 'शेक इट अप', 'चुक भूल दयावी घ्यावी' आणि ‘इंटरनेट वाला लव’ या मालिकांमधूनही  काम केलं आहे. सध्या 'स्टार प्रवाह' वाहिनीवरी लोकप्रिय असलेल्या 'स्वाभिमान : शोध अस्तित्वाचा' या मालिकेत त्या प्रा. अदिती सुर्यवंशीची लोकप्रिय भूमिका साकारत आहेत. 


कला आणि कलाकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच राष्ट्रवादीत प्रवेश : आसावरी जोशी


राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशासंदर्भातील बातम्यांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा'नं आसावरी जोशी यांच्याशी संवाद साधला. आपण चित्रपटसृष्टी, कला आणि कलाकार यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे आसावरी जोशी म्हणाल्यात. कलाकार, लोककलाकार यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मागच्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस संवेदनशीलपणे आणि गांभिर्यानं प्रयत्न करीत असल्यानंच हा पर्याय योग्य वाटल्याचं आसावरी जोशी म्हणाल्यात. पुढच्या काळात पक्षातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आपल्या क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे आसावरी जोशी 'एबीपी माझा'शी बोलतांना म्हणाल्यात. 


राष्ट्रवादीत वाढलं कलाकारांचं 'इनकमिंग' :


राज्यात शिवसेना आणि मनसेच्या चित्रपट आघाड्या सक्रिय आहेत. मात्र, गेल्या अडीच वर्षांत राष्ट्रवादीनं चित्रपट क्षेत्रात आपलं संघटन बळकट करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न चालविले आहेत. अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट आघाडीत मराठी-हिंदी चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेते-अभिनेत्री, गायक-गायिका प्रवेश करीत आहेत. पक्षाच्या चित्रपट आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी पुणे येथील बाबासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पाटील यांनी पक्षाची चित्रपट आघाडी मजबूत करण्यासाठी जाणिवपूर्वक प्रयत्न करीत अनेक सुप्रसिद्ध कलाकारांना पक्षाशी जोडलं आहे. जेष्ठ अभिनेत्री, सविता माल्पेकर, प्रिया बेर्डे, जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, सिद्धेश्वर झाडबुके, प्रियदर्शन जाधव, संभाजी तांगडे, सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना सुरेखा कुडची यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी राष्ट्रवादी चित्रपट आघाडीत अलिकडच्या काळात राष्ट्रवादी चित्रपट आघाडीत प्रवेश केला आहे. आसावरी जोशी यांच्या प्रवेशानंतर आणखी काही दिग्गज कलाकार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा'शी बोलतांना दिलीय.