मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा चर्चेचा विषय ठरला आहे. परदेशी असलेल्या पार्टनरसोबत पोर्न फिल्म शूट केल्याप्रकरणी सध्या राज कुंद्रा पोलीस कोठडीत आहे. त्याला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारीपासून हे प्रकरण चालू आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यात राज कुंद्रासह आणखीही काही लोकांची नावं आली त्यात एक नाव होतं उमेश कामत. 


Raj Kundra : तीन व्हॉट्सअॅप ग्रुप अन् लीगल टीमच्या आधारे सुरु होतं राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म्सचं साम्राज्य


राज कुंद्रा प्रकरणात आरोपी असलेल्या उमेश कामतच्या नावावरून आता हिंदी वाहिन्यांनी मराठी अभिनेता उमेश कामत याचा फोटो बातम्यांवेळी लावायला सुरूवात केली आहे. उमेश कामतनेच फेसबुकद्वारे ही माहिती दिली. आघाडीच्या हिंदी वृत्त वाहिन्यांनी राज कुंद्रा आणि त्याचा भागीदार उमेश कामत यांच्यातलं संभाषण दाखवताना मराठी अभिनेता उमेश कामत याचा फोटो दाखवायला सुरूवात केली. याचा नाहक त्रास आपल्या उमेशला झाला.



आपल्या सर्वांनाच अभिनेता उमेश कामत परिचित आहे. त्याने आजवर अनेक उत्तम सिनेमे, नाटकं आणि मालिका केल्या आहेत. सध्या 'अजूनही बरसात आहे' ही त्याची मालिका टीव्हीवर चालते आहे. गुगलवर उमेश कामत असं नाव टाईप केल्यानंतर आपल्या उमेशचे अनेक फोटो येतात. त्यामुळे नामसाधर्म्यामुळे हा गोंधळ झाला हे जरी मान्य असलं तरी माध्यमांनी फोटो देताना खातरजमा करायला हवी, असं उमेशला वाटतं. 






उमेश कामतने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये या प्रकाराचा जाहीर निषेध केला आहे. त्याने त्याचा फोटो टीव्हीवर दाखवला जात असतानाचे स्क्रीन शॉट्सही टाकले आहेत. शिवाय, या प्रकाराने जो नाहक बदनामी आपली झाली आहे, त्याबद्दल आपण कायदेशीर कारवाई करू असा इशाराही उमेशने या फेसबुक पोस्टमध्ये दिला आहे. 



राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाली आहे. राज कुंद्रा हा शिल्पा शेट्टीचा पती असून उद्योजक आहे. अश्लील चित्रपट बनवण्यासाठी राज पैसे पुरवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. राजचे नातेवाईक प्रकाश बक्षी इंग्लंडमध्ये राहतात. तिथे त्यांची केनरिन नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचे ते चेअरमन असून राज कुंद्रा भागीदार आहे. तर उमेश कामत हा राज यांचा माजी पीए आहे. तर केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातलं काम हा उमेश कामत पाहात होता.