Marathi Actor Shashank Ketkar Video: मराठी अभिनेता (Marathi Actor) शशांक केतकर (Shashank Ketkar) 'होणार सून मी ह्या घरची', 'मुरांबा' यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचला. शशांक नेहमीच आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांवर व्यक्त होत असतो. शशांकनं उपस्थित केलेल्या मुद्द्यांची दखल अनेकदा प्रशासनानंही घेतली आहे. शशांकचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शशांकनं रस्ते आणि त्यांची दुरावस्था, बंद असलेले लाईट्स यावरुन थेट सरकारवर आगपाखड केली आहे. मढवरच्या एका रस्त्याच्या मधोमध असलेल्या झाडाचा व्हिडीओ शेअर करत शशांक केतकरनं अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, संतापही व्यक्त केला आहे.
मराठी अभिनेता शशांक केतकरनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना शशांकनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "देशात development होते आहे याचा खरचं आनंद आहे, अभिमान आहे पण या आणि अशा दुर्लक्षित छोट्या छोट्या लाखो गोष्टी आहेत! हे फक्त एक उदाहरण. पाऊस खूप असेल वा नसेल, visibility नीट असेल वा नसेल… आम्ही सामान्य माणसांनी स्वतः चा जीव कसा वाचवायचा? हा भ्रष्टाचार सुद्धा नाहीये… हा फक्त कंटाळा, negligence आणि चालता है attitude आहे. Video मध्ये म्हटल्या प्रमाणे मी reflectors sponsor करायला तयार आहे. हेच reflector घ्या असा माझा हट्ट नाही! तुम्ही सांगा ते मी sponsor करतो. पण काहीतरी करा... @my_bmc आणि मननीय @mla_aslamshaikh जी, ज्यांची responsibility आहे त्यांच्या पर्यंत निरोप तुम्ही पोहोचवाल आणि काम होईल याची खात्री आहे, कारण या शहरातल्या प्रत्येकाची तुम्हाला काळजी आहे याचीही मला खात्री आहे."
शशांक केतकर व्हिडीओमध्ये काय म्हणाला?
व्हिडीओमध्ये बोलताना शशांक केतकर म्हणाला की, "पावसाळ्याचे दिवस येत आहेत. रस्त्यांवरील लाईट्स बंद असतील, धो-धो पाऊस पडत असेल आणि आम्हाला रस्त्याच्या मध्यभागी असलेली झाडे दिसलीच नाही तर... मला कल्पना आहे की, अनेकांसाठी मी जो हा असा आवाज उठवतो, तो हास्यास्पद असेल, पण प्रत्येकाला मनातून कुठेतरी पटत असतं. ही अशी परिस्थिती आपल्याला मुबंईत महाराष्ट्रात,भारतात अगदी प्रत्येक रस्तावर दिसते. डेव्हलपमेंन्ट खूप होत आहे, हे मान्य आहे. पण, हा काय भ्रष्टाचार सुद्धा नाही. हा फक्त निष्काळजीपणा आहे. मढ आयलंडचा हा रस्ता अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर करण्यात आला आहे. हा रस्ता करताना काही झाडे तोडली, पण ही दोन झाडे का ठेवण्यात आली आहेत? हे कोडं मला सुटलेलं नाही. जपानमध्ये झाडे मुळापासून तोडून पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लावण्याची पद्धत आहे, ही अपेक्षाच नाही आणि झाडे तोडून तुम्ही रस्ता करा, या मतांचीही मी नाही. पण, आता तुम्ही हा रस्ता केलाच आहात, मग ही दोन झाडे का ठेवली आहेत? म्हणजे ही झाडे रस्त्याची शोभा वाढवतायत की, दुभाजकाचं काम करत आहेत, हेच मला कळत नाहीत."
"जमलं तर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना रिफ्लेक्टर लावा आणि ते ऑनलाईन मिळतात. त्यांची लिंक हवं तर मी देतो. त्याचं बजेट अजून निघालेलं नसेल, किंवा त्याचं कंत्राट अजून कोणाला दिलेलं नसेल तर ते मला घ्या. शशांक केतकर यांच्याकडून असं लिहिलेलं दोन रिफ्लेक्टर तरी झाडाला लावा. म्हणजे आमच्या गाड्यांचे रिफ्लेक्टर त्यावर पडतील आणि आम्हाला ती झाडे दिसतील.", असं शशांक केतकर म्हणाला.
"आम्हाला मरायची इच्छा नाही. तुम्हाला आमची काळजी नसली तरी आम्हाला आमची काळजी आहे. त्यामुळे दोन रिफ्लेक्टर मागवा आणि ते या झाडांना लावा किंवा या झाडांचं काहीतरी करा. कारण, ही झाडे रस्त्याच्या मध्येही नाहीत किंवा बाजूलाही नाहीत. त्या या त्यांना कुठलेही रिफ्लेक्टरसुद्धा नाहीत.", असं शशांक केतकर म्हणाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :