Sachin Pilgaonkar Interview: मराठी सिनेसृष्टीतलं (Marathi Film Industry) नव्वदचं दशक गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते महागुरू सचिन पिळगांवकर (Marathi Actor Sachin Pilgaonkar) यांनी अनेक बॉलिवूड (Bollywood) सिनेमांमध्येही काम केलं. खरंतर सचिन पिळगांवकरांनी चाईल्ड अॅक्टर म्हणून इंडस्ट्रीत कामाची सुरुवात केली. अनेक हिट हिंदी सिनेमे (Hindi Movie), मराठी सिनेमे (Marathi Movie) आणि वेब सीरिजही (Web Series) सचिन पिळगांवकरांनी (Sachin Pilgaonkar) केल्यात. नव्वदच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर हे त्रिकुट प्रेक्षकांना अगदी पोट धरुन हसायला लावायचं. सचिन पिळगावकरांनी अनेक सिनेमांचं दिग्दर्शनही केलं. यामध्ये कल्ट सिनेमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'अशी ही बनवा बनवी' सिनेमाचाही समावेश होतो. पण, मुळात ते काही असंच व्हायचं म्हणून दिग्दर्शक झाले नाहीत, तर त्यांनी वयाच्या सातव्या वर्षीच हे स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यातही उतरवलं. याबाबत स्वतः सचिन पिळगावकरांनी एका मुलाखतीत बोलताना खुलासा केला होता. नेमकं काय म्हणालेले सचिन पिळगांवकर सविस्तर पाहुयात...
प्रिया बापट, सचिन पिळगांवकर आणि अतुल कुलकर्णी स्टारर 'सिटी ऑफ ड्रिम्स' निमित्तानं सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेनं एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीसाठी तिन्ही सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. याच मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकरांनी त्यांनी बालपणी पाहिलेल्या स्वप्नाबाबत खुलासा केला. सचिन पिळगांवकर म्हणाले की, मी वयाच्या सातव्या वर्षी दिग्दर्शक बनायचं स्वप्न पाहिलेलं, असं म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी त्यामागचा त्यांच्या बालपणीचा किस्साही सांगितला. पुढे बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, ज्या वयात मी काम सुरु केलं, त्या वयात मला दुपारी 2 तास झोपायला मिळायचा, त्यामुळे त्या काळात मी भरपूर स्वप्न पाहिलीत..."
सचिन पिळगांवकर नेमकं काय म्हणाले?
मराठी सिनेसृष्टीतले महागुरू सचिन पिळगांवकर म्हणाले की, "ज्या वयात मी काम सुरु केलं त्या वयात मला दुपारी 2 तास झोपायला मिळायचं. त्यामुळे मला भरपूर स्वप्न पाहण्याची संधी होती. खूप काळ मला दुपारी झोपायला मिळायचं. भरपूर स्वप्न पाहिली."
"पण एक स्वप्न मी अभिनेता बनल्यावर पाहिलं. ते म्हणजे वयाच्या 7 व्या वर्षी मी ठरवलं, मला दिग्दर्शक बनायचंय... आवड तर होतीच. मी सिटीलाईट सिनेमाच्या बाजूला राहायचो. माझं लहानपण तिथे गेलं. माझा जन्मही तिथलाच, टायकल वाडी... आमच्याजवळ सिटिलाईट सिनेमा होता तिथे मला कळलं की, 'कागज के फूल' हा सिनेमा लागलाय. त्याआधी प्यासा सिनेमा पाहिला होता मी. तो मला आवडला होता. गुरुदत्तजींचा मी एक फॅन झालो होतो.", असं सचिन पिळगांवकर म्हणाले.
पुढे बोलताना सचिन पिळगांवकर म्हणाले की, "त्यादिवशी मला काही काम नव्हतं. पप्पा बाहेर गेले होते. आई आणि मी आम्ही दोघेच घरी होतो. तेव्हा मी आईला, कागज के फूल बघायला जाऊ का, असं विचारलं. तिने पैसे दिले मला तिकिटाचे. मी गेलो तिकिट काढलं. पिक्चर पाहायला सुरुवात केली आणि गुंग झालो. इंटरव्हलमध्ये मी थंड, वेफर वगैरे काही खाल्लं नाही. तसाच बसून होतो. पिक्चर संपल्यावर 6 वाजता बाहेर निघालो. मनात त्या पिक्चरचा विचार करत होतो. परत एकदा बघू या का, असा विचार आला. काही खाल्लं नसल्याने खिशात पैसे होते. मी गेलो, तिकिट विकत घेतलं आणि 6 चा शो परत बघितला."
"सिटिलाईटवरुन (माहीम) घरी येताना मी घाबरलो. कारण घरात मी 6 चा शो बघणार असं काही सांगितलं नव्हतं. ग्राऊंड फ्लोअरला राहत होतो. घराच्या बाहेर पप्पा उभे होते. मला घाम फुटला. मी पप्पांजवळ गेलो. काय रे, कुठे गेला होतास, 3 चा शो होता ना.. असं पप्पा म्हणाले. मला आवडला म्हणून 3 नंतर 6 चा शो परत बघितला, असं त्यांना सांगितलं. याशिवाय माझ्या खिशातली तिकिटं त्यांना दाखवली. 9 चा शो पण बघणार का? असं पप्पांनी मला विचारलं. मी हो म्हणालो. मग आम्ही दोघांनी हा चित्रपट पाहिला.", असं सिचन पिळगांवकर म्हणाले.
"रात्री 12 वाजता हा सिनेमा पाहून घरी येताना बाबांनी विचारलं, तीनदा सलग तू हा चित्रपट पाहिलास. तुला एवढं काय आवडलं? मला विचार वेगळे आले पण तिसऱ्यांदा सिनेमा बघताना मी ठरवलंच की, मला दिग्दर्शक व्हायचंय. 7 वर्षांचा असून तू हे ठरवत आहेस, असं बाबांनी विचारलं. मी म्हटलं, हो.. ठरवलं. यात काही बदल होणार नाही. तर ते एक स्वप्न. मी बघितलं, ठरवलं आणि आज ते स्वप्न पूर्ण झालं.", असंही सचिन पिळगांवकर म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
महत्त्वाच्या इतर बातम्या :