Sachin Pilgaonkar On Ashi Hi Banwa Banwi: गेली कित्येक वर्ष मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry) गाजवणारा कल्ट सिनेमा म्हणजे, 'अशी ही बनवा बनवी' (Ashi Hi Banwa Banwi Movie). सिनेमा रिलीज होऊन एवढी वर्ष उलटली तरीसुद्धा या सिनेमाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), अशोक सराफ (Ashok Saraf) आणि सचिन पिळगांवकरांच्या (Actor Sachin Pilgaonkar) त्रिकुटानं धम्माल उडवली होती. आजही हा सिनेमा टिव्हीवर लागला तरीसुद्धा सगळे हातातली कामं बाजूला सारून धम्माल विनोदाची मेजवाणी अनुभवायला टीव्हीसमोर येऊन बसतात. अशातच सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले मराठी सिनेसृष्टीचे महागुरू सचिन पिळगांवकरांनी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकरांनी सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकेसोबतच सिनेमात आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं. सिनेमातील डायलॉग्स मी लिहिलेले असं सचिन पिळगांवकरांनी सांगितलं. ते म्हणाले की, 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातले मोजून तीन डायलॉग सेटवर बोलले गेले असतील. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिले होते. वसंत सबनीस आणि मी एकत्र बसून ती स्क्रीप्ट लिहिली होती.
मुलाखतीत बोलताना 'अशी ही बनवाबनवी'बाबत काय म्हणाले सचिन पिळगांवकर?
मराठी सिनेसृष्टीचे महागुरू सचिन पिळगांवकर म्हणाले की, "मी, अशोक आणि लक्ष्या.. आम्ही तिघं कायम एकत्र असायचो. आठवड्यातून किमान तीन वेळा तरी आम्ही एकमेकांना भेटायचो. एकदा एकाच्या घरी, नंतर दुसऱ्याच्या घरी.. असं करत आम्ही आठवड्यातून तीन वेळा भेटत असू. प्रत्येक फिल्ममेकरची पर्सनॅलिटी त्याच्या कामात दिसून येते. आमची ही घट्ट मैत्री 'अशी ही बनवाबनवी'पासून सुरू झाली. हा चित्रपट बनवताना मी आणि अशोक चांगले मित्र होतोच. पण लक्ष्याची मैत्री त्यावेळी आमच्यासोबत तेवढी घट्ट नव्हती. या चित्रपटानंतर तो अधिक खुलला..."
'अशी ही बनवाबनवी'ची स्क्रिप्ट मी लिहिली : सचिन पिळगांवकर
"अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट बनवताना एक कल्पना आली होती की, "भट्ट जमली आहे बॉस." त्यात मोजून तीन डायलॉग सेटवर बोलले गेले असतील. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिले होते. वसंत सबनीस आणि मी एकत्र बसून ती स्क्रीप्ट लिहिली होती. "धनंजय माने इथेच राहतात का?", हा डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिलेला होता. मी वसंत सबनीसांना करून दाखवलं होतं की मला कसा पाहिजे? हे जागेवर सुचलेलं नाही. हे ठरवून केलेलं आहे. "हा माझा बायको पार्वती" हा अशोकचा डायलॉग, "सारखं सारखं काय त्याच झाडावर" हा माझ्या तोंडी असलेला डायलॉग आणि "जाऊबाई, नका ओ जाऊ..." हा लक्ष्याचा डायलॉग तिथे आपसूकच म्हटले गेले होते. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये आधीपासूनच लिहिलेले होते.", असं सचिन पिळगांवकर म्हणाले आहेत.
"लक्ष्याला मी खूप मिस करतो. 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट 2005 मध्ये प्रदर्शित झाला. तो 2004 मध्येच मी बनवला होता. जानेवारी 2005 मध्ये तो थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटात मला त्याला घ्यायचं होतं. पण त्याच्या तब्येतीमुळे मी नाही घेऊ शकलो. त्याने स्वत:च मला नकार दिला होता. "तू म्हणतोयस, त्याचा मला आनंद आहे. पण मला डॉक्टरांनी परवानगी दिली नाही", असं तो म्हणाला होता. त्यामुळे तो त्या चित्रपटात नव्हता. दुर्दैवानं डिसेंबर 2004 मध्येच तो आपल्याला सोडून गेला. फक्त मीच नाही तर प्रेक्षक आणि संपूर्ण इंडस्ट्री त्याला मिस करते. पण माझं त्याला मिस करणं हे फक्त इंडस्ट्रीला मर्यादित ठेवून नाही. माझ्या वैयक्तिक जीवनातसुद्धा मी त्याला मिस करतो."
दरम्यान, या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ आणि सुशांत रे या चौघांनी धम्माल उडवली होती. याव्यतिरिक्त निवेदिता जोशी-सराफ, अश्विनी भावे, सुप्रिया पिळगांवकर यांसारख्या अभिनेत्रीही झळकल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
