Lalit Prabhakar: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मागील काही काळात त्याचे चित्रपट, वेब सीरिज आणि अभिनयाची सतत दखल घेतली जात असतानाच, आता त्याने लग्नाबाबत मांडलेल्या भूमिकेमुळे ठाम भूमिका चाहत्यांना करणारी ठरली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतील त्याचा रोमँटिक अंदाज आजही अनेक तरुणींच्या मनात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात ललितही तसाच असेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने थेट “मी लग्न करणार नाही” असं सांगितल्याने सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
38 वर्षांचा झालेल्या ललितला अनेकदा चाहत्यांकडून “आता लग्न कधी?” असा प्रश्न विचारला जातो. यावर बोलताना त्याने अत्यंत प्रामाणिकपणे आपली भूमिका मांडली. तो म्हणाला की, कॉलेजच्या काळात काही काळ तो नात्यात होता, पण त्यानंतर अनेक वर्षांपासून तो सिंगल आहे. सध्या त्याला एकटं राहणं आवडतं आणि स्वतःची सोबत त्याला पुरेशी वाटते. लग्न आणि रिलेशनशिप्सबाबत पुढे बोलताना ललितने स्पष्ट केलं की, त्याला लग्न ही संकल्पनाच पटत नाही. आयुष्यभर एका व्यक्तीसोबत बांधील राहण्याची कल्पना त्याला अस्वस्थ करते. समाजात अनेक गोष्टी परंपरेनं चालत आल्या आहेत, पण काळानुसार चुकीच्या प्रथा थांबल्या पाहिजेत, असं तो म्हणाला.
काय म्हणाला ललित?
लग्नाच्या बाबतीत मला लग्नसंस्थेविषयी अडचणी आहेत. मला अडचण याची वाटते की लोक आपल्याला सांगतात की तुम्ही लग्न करणं गरजेचं आहे एकत्र राहण्यासाठी. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नका सांगू की एकत्र राहण्यासाठी मी काय करायला पाहिजे. लग्न मी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी करतोय की स्वतःसाठी? जर आम्ही दोघेही आयुष्यात एकाच वळणावर असू आणि आम्हाला वाटत असेल की आम्ही एकमेकांसोबत आनंदी आहोत तर त्यात काहीही गैर नाही. वर्षांवर्षापासून ही संस्था चालत आली आहे आणि आपण त्याला पाळतोय. अशा कितीतरी प्रथा आपण बंद केल्या आहेत तुझ्या चुकीच्या होत्या. त्यामुळे मला लग्न संस्थेविषयी अडचण आहे. नंतर ललित म्हणाला की लग्न तर नाही करणार.
“मग तू कधीच लग्न करणार नाहीस का?” या थेट प्रश्नावर ललितने कोणताही संदिग्धपणा न ठेवता ‘नाही’ असं उत्तर दिलं. तो म्हणाला, “माझ्या आतापर्यंतच्या सिनेमांमध्ये मी लग्नाचे विधी इतक्या वेळा आणि इतक्या सुंदर पद्धतीनं साकारले आहेत की, खऱ्या आयुष्यात ते सगळं करण्याची गरज मला वाटत नाही.” ललित प्रभाकरचा हा स्पष्टपणा आणि लग्नसंस्थेबाबतची त्याची विचारसरणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून, अनेकजण त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत आहेत, तर काही चाहते मात्र ‘आदित्य’सारखा नवरा प्रत्यक्षात न मिळाल्याचं दु:ख व्यक्त करत आहेत.