Deepak Shirke Expressed Regret: ऐंशी-नव्हदच्या दशकात रुपेरी पडद्यावर खलनायकाची भूमिका साकारुन धडकी भरवणारे अभिनेते म्हणजे, दीपक शिर्के (Deepak Shirke). इंडस्ट्रीत अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खलनायकाची भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यापैकीच एक दीपक शिर्के. ज्या काळात हिरोला देव मानून त्याला आपल्या गळ्यातील ताईत बनवलं जायचं, त्याच काळात रुपेरी पडद्यावर दमदार खलनायक साकारुन प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवण्याचं काम दीपक शिर्केंनी केलं. रुबाबदार, भारदस्त व्यक्तीमत्त्व असलेल्या बहुगुणी अभिनेत्यानं मराठीसह (Marathi Movie), हिंदी सिनेमांमध्येही (Hindi Movie) महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नाही, तरीसुद्धा आपली मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर दीपक शिर्के यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. पण, एवढं काम करुन, एवढी प्रसिद्धी मिळवूनही या दिग्गज अभिनेत्याच्या मनात मात्र एक खंत आजही आहे, ती म्हणजे, पद्मश्री पुरस्कार न मिळाल्याची. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना त्यांनी आपली ही खंत बोलून दाखवत, मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. 

Continues below advertisement

दिपक शिर्के यांनी नुकतीच मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअर आणि खासगी आयुष्याबद्दल खुलासे केले. मुलाखतीत बोलताना राजाश्रय मिळायला हवा होता का? असा प्रश्न विचारल्यावर ज्येष्ठ अभिनेत्यानं आपल्या मनातली खंत व्यक्त सांगितली. ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के बोलताना म्हणाले की, "आता असं वाटतंय, पण तेव्हा असं कधी वाटलं नव्हतं... तेव्हा असं वाटायचं की, लोकाश्रयच बरा... राजा काय आपल्याला कधीही सांगेल- उभा राहा... नाच... त्यापेक्षा लोकाश्रयच बरा!" 

"लोकाश्रय मिळाला, पण राजाश्रय मिळाला नाही..." (Deepak Shirke On Padma Shri Award)

पुढे बोलताना दीपक शिर्के म्हणाले की, "लोकाश्रय मला खूप मिळाला पण राजाश्रय मिळाला नाही... आता आता असं वाटायला लागलंय. तेव्हा लोकाश्रय बरा वाटायचा. माझ्यामागचे लोक पद्मश्री घेऊन गेली, पण आम्ही इतकं करुन आम्हाला काहीच मिळालं नाही. आता मी आणि बायको आहे. आहोत. 60-65 वर्षांचा एक भाऊ आहे. वय झालंय, मग आता पुढे कोण असणार? हा प्रश्न उरतोच ना..."

Continues below advertisement

"...तर किमान 50 पोलीस तरी अंत्यसंस्काराला येतील" (Deepak Shirke Expressed Regret)

"ही व्यवस्थेची चूक नाही, माझं दुर्दैव आहे. त्यांना काय दोष द्यायचा. काय करायला हवं याचं उत्तर नाही माझ्याकडे. पण जर पद्मश्री मिळाला तर किमान 50 पोलीस तरी अंत्यसंस्काराला येतील," अशी खंत ज्येष्ठ अभिनेते दीपक शिर्के यांनी सौमित्र पोटे यांच्या मुलाखतीत व्यक्त केली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Subodh Bhave On Work Life And Money: 'पैशासाठी काही गोष्टी कराव्या लागतात...'; कामात पैशाचा समतोल ठेवण्याबाबत सुबोध भावे काय म्हणाला?