Subodh Bhave On Work Life And Money: मराठी मालिकाविश्वासोबतच (Marathi Serials), सिनेविश्वातही प्रसिद्ध असलेला बहुमुखी अभिनेता म्हणजे, सुबोध भावे (Subodh Bhave). आपल्या विविध मालिका, सिनेमे आणि त्यात साकारलेल्या वेगळ्या भूमिकांमुळे सुबोध भावे घराघरांत पोहोचलाय. सध्या झी मराठीवरच्या वीण दोघांतली ही तुटेना (Veen Doghatli Hi Tutena) या मालिकेत सुबोध मुख्य भूमिकेत दिसतोय. या मालिकेत त्याच्यासोबत तेजश्री प्रधानही मुख्य भूमिका साकारतेय. तसेच, सध्या तो त्याचा आगामी सिनेमा 'सकाळ तर होऊ द्या...'मुळे चर्चेत आहे. या सिनेमातली काही गाणी नुकतीच प्रदर्शित झालीत. याच निमित्तानं सुबोध भावेनं नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना केलेल्या एका वक्तव्यामुळे तो सध्या चर्चेत आला आहे.
मराठी अभिनेता सुबोध भावेनं नुकतीच 'व्हायफळ' या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारण्यात आलेलं की, काम आणि पैसे यामध्ये समतोल राखणं गरजेचं असतं, तर ते गेल्या 25 वर्षांत कसं केलं? यावर बोलताना अभिनेता म्हणाला की, "ते खूप महत्त्वाचं आहे. आपण करतोय त्याला दोन्ही अर्थांनी किंमत असायला हवी... ती किंमत आपल्यालाही मिळायला पाहिजे आणि समोरच्याला देखील त्याचा मोबदला मिळायला पाहिजे... त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे..."
"कधीच फुकटात काम करायचं नाही. पैसे कमी घेऊन काम करा. तुम्ही त्यांना सांगा की, तुमच्यासाठी मी कमी पैशात काम करत आहे. माझ्या सुदेवानं ही गोष्ट माझ्या लवकर लक्षात आली; पण पैशासाठी कधी काम सोडलं नाही. मी कामासाठीच काम करीत राहिलो. पैसा येत गेला. पैसा कमावला पाहिजेच. पण त्या पैशामुळे आनंद आला पाहिजे. त्यानं दुःख आलं नाही पाहिजे. त्या पैशानं झोप उडाली नाही पाहिजे. मला वाटतं की, ज्या क्षणी तुमची तुम्हाला गरज कळते. त्या क्षणी तुम्ही पैशाचा आनंद घ्यायला लागता. ज्यावेळी गरज आणि पैसा यामध्ये गल्लत निर्माण होते, त्यावेळी गोंधळ होतो.", असं सुबोध म्हणाला.
काही गोष्टी पैशासाठी कराव्या लागतात : सुबोध भावे (Subodh Bhave On Money)
"मला असं वाटतं की विचारांची स्पष्टता ज्या क्षणी आयुष्यात येते, त्या क्षणी आयुष्य सुंदर बनतं. जर गोंधळ असेल, तर काहीच आनंद मिळत नाही. कलाकार म्हणून जेव्हा आपण काम करतो, तेव्हा काही वेळा काही गोष्टी पैशासाठी कराव्या लागतात आणि त्यात काहीच गैर नाही. काही वेळा मात्र समाधानासाठी काम केलं जातं, जरी त्यात मानधनाचं समाधान नसलं तरी. पण यापैकी एक तरी समाधान मिळणं गरजेचं आहे.", असं सुबोध भावे म्हणाला.
पुढे बोलताना सुबोध भावे म्हणाला की, "जर या दोन्ही गोष्टी पैसा आणि समाधान मिळत नसतील, तर ते काम करू नका. एखाद्या भूमिकेसाठी पैसे चांगले मिळत असतील आणि त्यामुळे घर चालणार असेल, तर ते काम नक्की करा. पण जर पैसा नसेल, तरी भूमिकेत मजा आणि आत्मिक समाधान मिळत असेल, तर त्या कामात उडी घ्या. कारण असं काम पुढचं अनंत काम करण्याची ऊर्जा देतं. त्यामुळे कलाकाराने स्वतःमध्ये ही स्पष्टता ठेवणं फार महत्त्वाचं आहे."